केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यावर्षी जिल्ह्यातील वरोरा येथील आदित्य जीवने, मूलचा सुबोध मानकर, सावली येथील देवव्रत मेश्राम व चंद्रपूरचा अंशुमन यादव या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे प्रथमच या जिल्ह्यातील चार विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याची टक्केवारी वाढल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चारही विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी दोन हात करत करोना महामारीच्या जीवघेण्या संकटात हे यश मिळविले आहे हे विशेष.

मृत्युशी लढा देत यशाला गवसणी घालणारा आदित्य जीवने –

आदित्यने करोना महामारीच्या जीवघेण्या संकटात अक्षरश: मृत्युशी लढा देत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ३९९ व्या रँकने उत्तीर्ण होवून यशाला गवसणी घातली आहे. नागपुरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता होवून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करण्याचा त्याने निर्णय घेतला. विद्यार्थी दशेत वडील प्रा. चंद्रभान जीवने यांनी मुलगा आदित्य याला यूपीएससीचे पुस्तक भेट स्वरूपात दिले आणि तिथूनच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बांधले. त्यानंतर २०१८ पासून वरोरा येथे स्वत:च्या घरी राहून मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून अभ्यासाला सुरूवात केली. दुसऱ्या कुणाशी स्पर्धा न करता स्वत:ची स्वत:सोबतच स्पर्धा करून यूपीएससीचा नियोजित अभ्यास सुरू केला. लेखी परीक्षेत यश मिळाले, परंतु मुलाखतीत यश प्राप्त झाले नाही. पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरला म्हणून विचलीत न होता पून्हा नव्या जोमाने नियोजनानुसार अभ्यास सुरू ठेवला आणि त्याला यशाची प्राप्ती झाली. विशेष म्हणजे कुठलीही शिकवणी न लावता घरीच राहून अभ्यास केला. मे महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखतीची तयारी सुरू होती. मुलाखतीच्या तयारीसाठी वारंवार दिल्ली येथे जाणे येणे सुरू होते. या काळात दिल्लीत करोना महामारीने अक्षरश: थैमान घातले होते. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत होती. आज इतके मृत्यू, उद्या इतके मृत्यू अशा आशयाच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरू होत्या. अशा कठीण काळात दिल्ली येथे मे महिन्यात यूपीएससीच्या मुलाखती असल्याने एप्रिल महिन्यातच दिल्लीत दाखल झाला. त्याकाळात दिल्लीमध्ये करोनाचा कहर सुरू होता. त्यात त्याचा मित्र करोना पॉझिटिव्ह आला. त्याला मदत करताना आदित्यसुद्धा करोना पॉझिटिव्ह आला. त्याचा स्कोअर १८ होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अधिकारी यांच्या मदतीने दिल्ली येथील कमील मल्टीस्पेशालिटी रुग्णलयात तो भरती झाला आणि तिथेच त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू झाला. सलग सात दिवस उपचार घेवून आदित्यने मृत्यूला हरवले. त्यासाठी तामिळनाडूचे राज्य पोलीस सचिव आनंद पाटील, दिल्ली येथे कार्यरत असलेले महाराष्ट्रातील आयपीस अधिकारी स्वागत पाटील, हैदराबाद पोलिस अधीक्षक महेश भागवत, मुंबई आयआरएस नितेश पाथोडे यांनी करोनाच्या काळात त्याला मदत केली आणि करोनाला हरवून आदित्य वरोरा येथे परतला. काही दिवस येथील डॉ. खापणे यांच्या मार्गदर्शनात उपचार घेऊन त्यांनी परत मुलाखतीची तयारी सुरू केली. १७ ऑगस्टला मुलाखत दिली आणि तो ३९९ रँक प्राप्त करून आज यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
woman gave birth in an ambulance
नंदुरबार : एका आरोग्य केंद्रातून दुसऱ्या केंद्रात पाठवणी, बंद रुग्णवाहिकेतच प्रसुती, अन…
Village to JNPT Rajendra Salves successful journey
वर्धानपनदिन विशेष : गाव ते जेएनपीटी… राजेंद्र साळवेंचा यशस्वी प्रवास
Jayant Patil son
जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी

दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारा सुबोध मानकर –

मूल येथील बालविकास प्राथमिक शाळेत सुरूवातीचे शिक्षण, दहावी नवभारत विद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर थेट नागपूर व तिथून अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पुणे गाठणाऱ्या सुबोध रमेश मानकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ४६८ रँकने उत्तीर्ण केली आहे. दोन वर्षे खासगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केल्यानंतर काहीतरी ठोस करण्याच्या उद्देशाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. दिल्ली येथे जावून कोचिंग घेतले. मात्र पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र यामुळे खचून न जाता सुबोधने दुसऱ्या प्रयत्नात स्वत: अभ्यास केला आणि ४७३ रँकने यूपीएससी परीक्षा पास झाला. त्याला इंडियन रेल्वे अकाऊंट सर्व्हिस मध्ये नोकरी मिळाली. मात्र यावर सुबोध समाधानी नव्हता. त्याला आयएएस रँक हवी होती. त्यामुळे एक वर्षाची सूटी घेवून पून्हा यूपीएससीची तयारी सुरू केली. करोनाच्या संकटात पुण्यात अभ्यास होणार नाही म्हणून मूल येथे येवून इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला. त्या काळात मूल शहरात करोनाने थैमान घातले होते. परंतु घराच्या बाहेर न पडता अभ्यासात रमणाऱ्या सुबोधने ४६८ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. एससी प्रवर्गात येत असल्यामुळे आयपीएस किंवा समकक्ष रँक मिळेल यावर त्याचा विश्वास आहे. सध्या सुबोध हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेत आहे. सामान्य शिक्षक व गृहिणीच्या मुलाने दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

दिल्ली येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत अंशूमन यादव –

चंद्रपूर येथील जटपूरा गेट येथे वास्तव्य असलेला व आता दिल्ली येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत अंशूमन यादव हा २४२ रँकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. अंशुमनचे वडिल वेकोली मध्ये कार्यरत आहे. त्याने यशाचे श्रेय आई, वडील व कुटूंबियांना दिले.

कठोर परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारा देवव्रत मेश्राम –

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत जिल्ह्यातील मागास समजल्या जाणाऱ्या सावली येथील देवव्रत वसंत मेश्राम याने ७१३ व्या रँकने उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. देवव्रतचे चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण सावलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. नवोदय विद्यालय, तळोधी येथून दहावी व समोरचे शिक्षण घेतले. आयआयटी खडकपूर येथून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर यूपीएससीसाठी प्रयत्न सुरू केले. वडील वसंत मेश्राम विश्वशांती विद्यालय, सावली येथे मुख्याध्यापक होते. तर आई गृहिणी आहे. वडिलांच्या निधनानंतर देवव्रतने स्वत: कठोर परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करित वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.