चंद्रपूर : ब्रम्हपुरीच्या जंगलात जखमी अवस्थेतील वाघिणीस केले जेरबंद!

गोरेवाडा प्राणीसंग्रहालय व बचाव केंद्र येथे उपचारार्थ हलविण्याच्या हालचाली सुरू

ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत तळोधी वन परिक्षेत्रातील गोविंदपूर उपक्षेत्रात कच्चेपार नियतक्षेत्र येथे आज सकाळी एका जखमी अवस्थेतील वाघिणीला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. दरम्यान दोन ते अडीच वर्षे वयाच्या या वाघिणीला गोरेवाडा प्राणीसंग्रहालय व बचाव केंद्र येथे उपचारार्थ हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत तळोधी वनपरिक्षेत्रात वन कर्मचारी गस्त करत असतांना शुक्रवार २१ मे रोजी जी १ नावाची वाघीण लंगडत असल्याचे व दोन ते तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी बसून असल्याने अशक्त दिसून आली. त्यामुळे सदर वाघिणीला वैद्यकीय उपचारार्थ जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांकडून परवानगी मागण्यात आली.

प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांनी वाघिणीला जेरबंद करण्याची परवानगी दिली. त्यानंतर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी शुक्रवार पासून मोहीम राबविण्यात आली. आज या वाघिणीला सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून पिंजऱ्यात जेरबंद केले.

ही कार्यवाही वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच आरआरटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचे उपस्थितीत केली गेली.जेरबंद वाघीण अंदाजे दोन ते अडीच वर्षे वयोगटाची आहे. वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला नागपूर लगतच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालय तथा बचाव केंद्र येथे हलविण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती ब्रम्हपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक बीपेश मल्होत्रा यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chandrapur in the forest of bramhapuri injured tiger was put in a cage msr

ताज्या बातम्या