सीआयएसएफविरुद्ध कामगार संघटनांचा संपाचा इशारा

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा वर्षांला नफा १८६ कोटी असतांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) वर वर्षांकाठी १५० कोटी खर्च होणार असून तो खर्च वीज केंद्राला करावा लागणार असल्याने ही सुरक्षा व्यवस्था नाकारावी अन्यथा, ३१ मार्चपासून सर्व संघटना संयुक्त कृती समितीने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. १ एप्रिलपासून सीआयएसएफचे जवान  तैनात होणार आहेत, हे विशेष.

सुरक्षा कायद्यांतर्गत वीज केंद्राच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ बोलविण्यात येत आहे. आज तिन्ही वीज कंपन्यांवर ५५ हजार कोटींचे कर्ज आहे. राज्यात महाजनकोचा सुरक्षा कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च ४८ कोटी रुपये आहे. सीआयएसएफचा फक्त चंद्रपूर प्रकल्पाला वर्षांचा खर्च ५४ कोटी व सुविधेसाठीचा खर्च ६२ कोटी येणार आहे. असा ११६ कोटी रुपये लागतील. ४० वषार्ंपासून महाजनकोसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ज्या सुविधा मिळाल्या नाहीत, त्या सीआयएसएफला ३ महिन्यातच मिळणार आहेत. त्यातच या वीज केंद्राचा वर्षांला नफा केवळ १८६ कोटी आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर सुरक्षा बदलावरचा खर्च वर्षांला सुमारे १५० कोटी होणार असल्याने हा करार वीज केंद्राला परवडणार नाही, अशी ओरड आताच सुरू झाली आहे. १ एप्रिलपासून सीआयएसएफचे २५० व त्यानंतर पुन्हा १५० सुरक्षा रक्षक येणार आहेत.

विशेष म्हणजे, हे सर्व सुरक्षा गार्ड उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याने या प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय सर्व वीज कामगार संघटना सहन करून घेणार नाही. जर प्रकल्पग्रस्तांना सुरक्षेचे योग्य प्रशिक्षण दिले, तर ४०० प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळू शकतो. या सुरक्षा रक्षकांना वेगळी जागाही देण्यात आलेली आहे. त्या जागेवरील झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. त्यातच या वीज केंद्राचे संच क्रमांक १ व २ बंद केले आहेत. भविष्यात ३ व ४ युनिट प्रदूषणाच्या नावाखाली बंद करण्यात येणार असल्याने या वीज केंद्राचे उत्पन्न १८६ कोटीवरून थेट १४० कोटी झाले आहे. आर्थिक उत्पन्नाच्या वस्तुस्थितीनुसार ही सुरक्षा या प्रकल्पाला परवडणारी नाही, त्यामुळे हा प्रकल्प तोटय़ातच चालणार आहे. भविष्यात हे सर्व प्रकल्प बंद होऊ शकतात. चंद्रपूर महाजनकोला वाचविण्यासाठी या सुरक्षा दलाविरोधात वीज केंद्रातील सर्व संघटनांनी ३१ मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सीआयएसएफ आल्यानंतर त्याच्या खर्चाचा बोझा महाजनकोवरच पडेल, पर्यायाने वीज दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व विचार करून वीज केंद्रातील संघटना सीआयएसएफविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.