चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील १ हजार मेगाव्ॉटचा विस्तारित प्रकल्प मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. त्या दृष्टीने युध्दपातळीवर काम सुरू असून ५०० मेगावॅटचा ८ वा संच ऑक्टोबरच्या शेवटच्या, तर ५०० मेगावॅटचा ९ वा संच मार्चपर्यंत सुरू होण्याची शक्यता  आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पावर गेल्या सहा वर्षांंपासून काम सुरू आहे.

या जिल्ह्य़ात मुबलक कोळसा व पाणी असल्यामुळे २३४० मेगावॅट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारीकरणाचा निर्णय तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार २००९ मध्ये १ हजार मेगावॅटच्या विस्तारित प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली. यानंतर या प्रकल्पाचे प्रत्येकी ५०० मेगावॅट क्षमतेच्या ८ व ९ क्रमांकाच्या संचाचे काम सुरू झाले. मात्र, बीजीआर कंपनीने अतिशय कासवगतीने काम केल्याने या प्रकल्पाच्या पूर्णत्वास बराच विलंब लागला. सध्या ५०० मेगावॅटचा ८ वा संच वीज निर्मितीसाठी तयार आहे. विशेष म्हणजे, परीक्षणांतर्गत असलेल्या या संचातून दररोज २५० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. येत्या ऑक्टोबर अखेरीस हा संच पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर विधिवत लोकार्पण केले जाणार आहे. तो सुरू होताच ५०० मेगावॅटच्या ९ व्या संचाचे काम हाती घेतले जाणार आहे. साधारणत: डिसेंबरच्या शेवटी या संचाचे लाईटप केले जाणार आहे. यानंतर मार्चपर्यंत या संचातूनही वीजनिर्मिती केली जाईल, अशी माहिती विस्तारित प्रकल्पाचे मुख्य अभियंता भोंगाडे यांनी दिली.

दरम्यान, येत्या मार्चपर्यंत ८ व ९ असे दोन्ही संच सुरू करण्याचा कार्यक्रम ऊर्जा मंत्रालयानेच आखला आहे. त्या दृष्टीनेच युध्दपातळीवर कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांंपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प २०१२ मध्येच पूर्ण व्हायला हवा होता. प्रत्यक्षात तीन वष्रे उशिराने म्हणजे २०१६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. बीजीआर या प्रमुख कंपनीमुळेच हा प्रकल्प उशिरा पूर्ण होत आहे. त्यामुळे या कंपनीला १० टक्के दंडही आकारण्यात आलेला आहे.

प्रदूषणामुळे वीज केंद्राला नोटीस

विस्तारित प्रकल्पाच्या ५०० मेगाव्ॉटच्या संच क्रमांक ८ मधून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वीज केंद्राला नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीच या संचाचे निरीक्षक केले. या निरीक्षणात ईएसपी यंत्रणा बंद असल्यामुळे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास येताच ही नोटीस बजावण्यात आली. एका आठवडय़ात यावर वीज केंद्राला उत्तर द्यायचे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस मिळाली असून वीज केंद्राने प्रदूषण मंडळाला उत्तरही सादर केले असल्याचे मुख्य अभियंता भोंगाडे यांनी सांगितले.