scorecardresearch

चंद्रपूर : शेतकऱ्याच्या घरात शिरलेली वाघीण अखेर जेरबंद

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र
नागभीड तालुक्यातील ब्राम्हणी गावात धुमाकूळ घालून शेतकऱ्याल जखमी केलेल्या पट्टेदार वाघिणीला सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद करण्यात आले. दरम्यान, जखमी अवस्थेतील या वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात पाठविण्यात आले आहे.

ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत नागभीड वनपरिक्षेत्रातील ब्राम्हणी गावातील पिंटू देशमुख यांच्या घरात वाघिणीने शिरकाव केल्याची माहिती, वन विभागाला रविवार, २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मिळाली होती. माहिती मिळताच वन विभागाचे क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच, सदर वाघिणीला जेरबंद करणे हेतू वन्यजव विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूला पाचारण करण्यात आले. रात्री १० वाजेच्या सुमारास ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे आरआरटी पथकासह दाखल झाले. त्यानंतर जवळपास पंधरा ते वीस मिनिटं वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाघीण काही केल्या प्रतिसाद देत नव्हती. शेवटी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून वाघिणीला बेशुध्दी केले गेले.

या कार्यवाहीत वन विभागाचे कर्मचारी, चिमूर, मूल येथील वन कर्मचारी अजय मराठे, पोलीस शिपाई, ताडोबा प्रकल्पाचे अमोल ताजने, सुरेंद्र मंगाम, श्रीराम आडे, सतिश नागोसे, अमोल नेवारे, नागोबा ठाकरे, सुरज बोंडे, राहुल धनविजय यांचा सहभाग होता.  जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या आदेशान्वये पहाटेच्या सुमारास वाघिणीला गोरेवाडा प्राणीसंग्रहालय व बचाव केंद्र, नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrapur tigress who entered in a farmer house was finally caught msr