अलिबाग- महसूल दिनाच्या कार्यक्रमात खूद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे याच्यांवर माफी मागण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नाराजीनंतर महसूल मंत्र्यांनी प्रशासनाच्या चुकीसाठी जाहीर माफी मागीतली.
अलिबाग येथे रविवारी महसूल दीन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियाना अंतर्गत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे. रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह रायगड जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधइकारी नेहा भोसले यांच्या सह अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते., महसूल विभागा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विवीध योजनांच्या लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश होता.
महसूल मंत्री सोहळ्यास उपस्थित राहणार असल्यांने प्रशासानाने कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती. नागरीकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा कार्यक्रम राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजला. खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री यांची नाराजी कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी राहीली. त्यामुळे खूद्द महसूल मंत्र्यांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली.
महसूल दिनाच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रम पत्रिकेवर खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री यांचे नाव राजशिष्टाचाराप्रमाणे छापण्यात आले होते. मात्र दिल्लीत लोकसभा अधिवेषणासाठी असल्याने, खासदार सुनील तटकरे यांना प्रशासनाकडून रितसर आमंत्रण देण्यात आले नव्हते. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनाही सन्मानाने निंमत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे दोघांनीही कार्यक्रमाला हजेरी लावत जाहीर कार्यक्रमात आपली नाराजी व्यक्त केली. दोघांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार पणाबाबत संताप व्यक्त केला. राजशिष्टाचार पाळला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तटकरेंची जाहीर माफी मागण्याची वेळ आली. महसूल यंत्रणा कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त होती. त्यामुळे आयोजकांच्या वतीने अनावधानाने खासदार तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना प्रत्यक्ष भेटून अथवा संपर्क करून निमंत्रित करायचे राहून गेले ज्यासाठी मी प्रशासनाच्या वतीने जाहीर माफी मागत असल्याचे स्पष्ट केले. मात्र तरीही खासदार तटकरे यांची नाराजी दूर झाली नव्हती. नंतर शासकीय विश्राम गृहात महसूल मंत्री यांनी या नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी चांगल्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे आणि प्रशासनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे ही तटकरे कुटुंबाची जुनी सवय आहे. रोहा श्रीवर्धन मध्ये कार्यक्रम असेल तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असते पण इतर ठिकाणी ते राजशिष्टाचारा संदर्भांत आक्रमक असतात असे म्हणत कार्यक्रमानंतर टीका केली. जिल्हा परिषदेच्या निधी वाटपावरून हा वाद झाल्याचा दावा त्यांनी केला.
