Premium

“मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतोय”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे.

Pankaja Munde
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया. (PC : Pankaja Munde Facebook)

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर पंकजा मुंडे प्रसारमाध्यमांशी बोलल्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे”. पंकजा मुंडे यांच्या या बेधडक वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, भाजपात पंकजा मुंडे यांची घुसमट होत असल्याची राजकीय वक्तव्ये येऊ लागली आहेत. तसेच पंकजा मुंडे यांना भाजपाने बाजूला केलं असल्याच्या चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं. या सगळ्यामुळे पंकजा मुंडे या सध्या राज्याच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर आता भारतीय जनता पार्टीकडून प्रतिक्रिया आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल विचारलं. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सध्या राज्यातले अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत. या अडचणीच्या काळात पंकजा मुंडे यांना एखादी नोटीस आली असेल, म्हणून त्या असं बोलल्या असतील.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माझी आणि पंकजा मुंडे यांची भेट झालेली नाही. मी त्यांना भेटल्यावर नक्कीच त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन. मला सध्या याबद्दलची पूर्ण माहिती नाही. परंतु, पंकजा मुंडे यांच्याबद्दल कोणीही कुठलाही गैरसमज पसरवू नये, असं मला वाटतं.

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “गोपीनाथ मुंडे यांना जो संघर्ष करावा लागला, तोच संघर्ष मला करावा लागत नाहीये. मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे. कारण गोपीनाथ मुंडेंच्या वेळी संघर्षाची एक पातळी होती. तो वैचारिक संघर्ष होता. दोन गटांमध्ये किंवा दोन विचारांमध्ये तडजोड झाली नाही. आता तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे माझा संघर्ष जास्त आहे.”

हे ही वाचा >> “मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला आमचा विरोध”, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

पंकजा मुंडे १०० कोटींच्या कर्जाबाबत काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी १०० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि दुसरीकडे वापरलं असं काही नाही. हे २००९-२०१२ दरम्यान गोपीनाथ मुंडेंच्या काळातलं कर्ज आहे. हा कर्जाचा, मतदारसंघातील संघर्षाचा विषय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrashekhar bawankule first reaction after notice to pankaja munde sugar factory asc

First published on: 27-09-2023 at 13:23 IST
Next Story
मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य, “४० दिवसांचा वेळ सरकारला दिला आहे, आरक्षण घेतल्याशिवाय….”