Chandrashekhar Bawankule On Harshvardhan Patil : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. तसेच उमेदवारांबाबतही चाचपणी केली जात आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून राज्यभर मोर्चेबांधणी सुरु आहे. असं असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
तसेच ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप हर्षवर्धन पाटील यांनी या चर्चेचं खंडन केलं नसल्याने संदिग्धता वाढली आहे. या चर्चांवर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. “त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचा : मविआच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“महायुतीमध्ये ज्या विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे जातील, त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत लढलेले आमचे नेते आहेत. मात्र, त्यांना थांबायचं नाही. शेवटी त्यांनी थांबावं, अशी आमची इच्छा आहे, आमची त्यांना विनंती आहे. मात्र, शेवटी त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. आता महाविकास आघाडीचे अनेक नेते आहेत की, ते तिकडून आमच्याकडे येणार आहेत. मग याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकीट मिळेल. माझं असं म्हणणं आहे की, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना सल्ला दिला आहे.
पक्ष सोडणार असल्याची चर्चा का?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूरच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. मात्र, महायुतीमध्ये इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. कारण येथे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, ही जागा भाजपाला मिळणार नसल्याची शक्यता असल्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.