BJP-MIM Politics : अचलपूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम एकत्र आल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. विरोधकांकडून या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील राजकीय घडामोडींबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अचलपूरमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तेथे भाजपाचे ९ नगरसेवक आहेत. बाकी सर्व काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), एमआयएम निवडून आले आहेत. त्या सर्वांनी आपापले गट तयार केले आहेत. भाजपाच्या गटात कोणीही एमआयएम, काँग्रेस नाहीये. तेथे काँग्रेसने आपला एक गट तयार केला, स्थानिक विकास आघाडीने एक वेगळा गट तयार केला, त्यांनी बसून तेथे…आम्ही (भाजपा) अल्पमतात आहोत. एकूण ३६-३७ नगरसेवक आहेत, त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापतीपद वाटून घेतले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
भाजपाचा काही संबंध नाही. भाजपा एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. कालही आम्ही स्पष्ट केलं की, अचलपूरमध्ये एमएमचा आम्हाला कोणताही पाठिंबा नाही आणि आमचा कुठलाही पाठिंबा एमआयएमला नाही, असेही बावनकुळे यांनी आज (२३ जानेवारी) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
अचलपूरमध्ये नेमकं काय झालं?
अचलपूर नगरपालिकेच्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीच्या वेळी भाजपाकडून विविध विषय समित्यांचे सभापती तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पद्धतीने व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यात भाजपाला यशही आले. या मतैक्याचा फायदा एमआयएमलाही झाला आणि एक सभापतीपद या पक्षाच्या वाट्याला आले.
गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत अचलपूरचे नगराध्यक्षपद पहिल्यांदाच भाजपाकडे आले. मात्र ४१ पैकी १५ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याचवेळी १० अपक्ष निवडून आले. भाजपाला ९ जागा मिळाल्या. तीन जागांवर एमआयएमचे तर राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.
भाजपाने पाठिंबा दिलेल्या अपक्षांच्या गटाकडून एमआयएमच्या उमेदवारांचे नाव समोर करण्यात आले आणि या उमेदवाराची बिनविरोध निवड देखील झाली. यामुळे भाजपा आणि एमआयएम एकत्र आले, त्यांची युती झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
