Chandrashekhar Bawankule On Nilesh Rane Sting Operation: राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यभरात नेत्यांच्या सभा आणि मेळावे सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीमधील पक्षही आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सर्वाधिक चर्चा कोकणातील राजकारणाची सुरू आहे. या चर्चांचं कारण म्हणजे शिवसेना (शिंदे) आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजपाच्या पदाधिऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी संबंधित भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या घडामोडींवर आता भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत निलेश राणे यांनाच सुनावलं आहे. ‘एखाद्याच्या घरात थेट बेडरूमपर्यंत जाऊन अशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करणं योग्य आहे का?’, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करतील असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
निलेश राणेंनी नेमकं काय स्टिंग ऑपरेशन केलं?
शिवसेना (शिंदे) आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजपाच्या पदाधिऱ्याच्या घरी छापा टाकला. यावेळी संबंधित भाजपाच्या पदाधिऱ्याच्या घरात नोटांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. या संदर्भात निलेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लाईव्ह देखील केलं आहे. तसेच या लाईव्ह व्हिडीओमध्ये निलेश राणे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून भाजपा आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मंत्री बावनकुळे काय म्हणाले?
“ज्यांच्या घरात पैसे आहेत, त्यांनी ते पैसे कुठून आणले? ते पैसे कोणत्या व्यवहारातील आहेत? याचा तपास पोलीस करतील. त्यामुळे आज असं म्हणणं योग्य नाही की भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले. पैसे आहेत हे ठिक आहे. मात्र, एखाद्याच्या घरात बेडरूमपर्यंत जाऊन अशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करणं हे चुकीचं आहे. अशा प्रकारे कोणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का? किंवा कोणाच्या बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का?”, असा सवाल मंत्री बावनकुळे यांनी विचारला आहे.
“निलेश राणेंनी काय करावं हे मला माहिती नाही. पण एखाद्याच्या बेडरूमपर्यंत जाऊन व्हिडीओ शूटिंग करणं हे नियमाच्या बाहेर आहे असं मला वाटतं. पण तरीही निलेश राणे यांनी पोलिसांच्या आणि निवडणूक आयोगाच्या जे लक्षात आणून दिलं आहे ते पाहता यामध्ये निवडणूक आयोग आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील”, असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपाच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

