scorecardresearch

“देशात संविधानापेक्षा मोठं कोणीही नाही”, राहुल गांधींचं संसद सदस्यत्व रद्द होताच चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “ओबीसी समाजाबद्दल…”

मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

chandrashekhar bawankule reaction on rahul gandhi
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चोराला चोर…”!

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. या देशात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान, काल न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर बावनकुळेंनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. “त्या वक्तव्यामुळे यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजातून येतात, तो समाज राहुल गांधी यांचा निषेध करतोय. तेली समाज हा ओबीसींमधला मोठा घटक आहे. मोदींसारख्या नेतृत्वाला जातीवाचक शिव्या देणे हा गुन्हा असून कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. अखेर आज आम्हाला न्याय मिळाला आहे. न्यायालयाकडून ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे.”, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – राहुल गांधींचं संसद सदस्यत्व रद्द होताच नाना पटोले आक्रमक; म्हणाले, “गेल्या नऊ वर्षांत मोदींच्या मित्रांनी…”

नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 16:00 IST

संबंधित बातम्या