Chandrashekhar Bawankule reply to Sanjay Raut: “देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत खेचलं जाईल”, या आदित्य ठाकरेंच्या दाव्याने राज्यात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. यात भर म्हणून संजय राऊतांनी फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जातील, अशी शक्यता वर्तवली. दिवसभर या विषयावरुन राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा रंगल्यानंतर आता स्वत: बावनकुळेंनी यावरुन मौन सोडले आहे. “मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये”, अशी भूमिका बावनकुळेंनी स्पष्ट केल्यानंतर सुषमा अंधारेंनी त्यांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.

संजय राऊतांचा दावा आणि बानकुळेंची स्पष्ट केली भूमिका

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राची सूत्रं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जातील असे खासदार संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. असे त्यांचे आकलन असल्याचेही राऊतांनी पुढे म्हटले होते. बावनकुळेंनी यावर भूमिका स्पष्ट करताना याला “अफवांचा बाजार” म्हटले. “सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन, म्हणावे लागेल”, असे म्हणत बावनकुळेंनी राऊतांच्या शक्यता खोडून काढल्या. तसेच, २०३४ पर्यंत देवेंद्रच मुख्यमंत्री राहावेत अशी महाराष्ट्राच्या जनतेची भावना असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये – बावनकुळे

“सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे”, असे बावनकुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये”, असेही बावनकुळेंनी पुढे पोस्टमध्ये लिहलंय. या स्पष्टीकरणावर, “काळजावर मोठा दगड ठेवून स्वतः स्वतःची समजूत काढायला सुपा एवढं काळीज लागतं”, अशा शब्दात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बावनकुळेंना डिवचले.

अंधारेंनी बावनकुळेंना डिवचले

“काय हे बावनकुळे साहेब, काळजावर एवढा मोठा दगड ठेवून स्वतः स्वतःची समजूत काढायला सुपा एवढं काळीज लागतं.. पण हे सांगत असतानाच देवेंद्र फडणवीस अजून किमान दशक भर तरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कधीच असणार नाहीत हे ज्या शिताफीने तुम्ही मांडले आहे ते काबिल-ए-तारीफ आहे”, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी बानकुळेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याबाबत केल्या जाणारे दावे आणि राजकीय चर्चांबाबत विचारले असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. “मी परवाच दिल्लीला जाऊन आलो,” अशा शब्दात फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.