Revenue Department Scam Investigation: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात त्यांच्याच विभागात झालेल्या एका घोटाळ्याबद्दल माहिती दिली आहे. महसूल खात्यात प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद सभागृहात दिली. शुद्धलेखनात बदल करण्याच्या नियमाचा वापर करून एका व्यक्तीची जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्याची हजारो प्रकरणे तपासली जात असल्याचेही बावनकुळे म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना या घोटाळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महसूल संहिता एमएलआरसी कोडमध्ये १५५ व्या कलमात तहसीलदाराला एक अधिकार आहे, ज्यामध्ये शुद्धलेखनात जर चूक झाली तर दुरूस्त करता येते. म्हणजे एखाद्या नावात चूक झाली किंवा आडनावात चूक झाली तर ती दुरूस्त करण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. पण यांची जमीन त्यांच्या नावाने करून देणे १५५ च्या नियमात बसत नाही, अशी वेगवेगळ्या पद्धतीची प्रकरणे १५५ खाली आढळली आहेत. पुणे विभागात आम्ही ३६ हजार प्रकरणं आम्ही ओळखली आहेत. त्यामधील जवळपास ३ हजार प्रकरणे आम्ही तपासली आहेत. जवळपास ५०० प्रकरणांमध्ये गंभीर दोष आढळून आले आहेत,” असे बावनकुळे म्हणाले.
विभागीय आयुक्त, नाशिक यांची एक समिती आम्ही तयार केली होती. या समितीने हा संपूर्ण रिपोर्ट शासनाला दिला आहे. काय कारवाई करावी या शिफारसी देखील यामध्ये आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज्याच्या संपूर्ण महसूल विभागांचा विचार केला तर फक्त पुणे विभागाची चौकशी केली आहे. मग नाशिक, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात असे किती प्रकरणे आहेत? याचाही तपास पुढील तीन महिन्यात विभागीय आयुक्तांची समिती करणार आहे. आता पहिला तपास फक्त पश्चिम महाराष्ट्राचा झाला आहे, तोही फक्त तीन हजार प्रकरणांचा झाला आहे. यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काय करावाई करणार याबद्दलचा शासन निर्णय करणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
एकंदरीत मागच्या पाच वर्षांमध्ये, म्हणजे मी मंत्री होण्यापूर्वीचे पाच वर्ष, किंवा त्यापूर्वीचे अनेक वर्ष या अधिकार्यांनी दुरुपयोग केला आहे, यावर योग्य कारवाई सरकार करणार आहे. अॅक्शन टेकन रिपोर्ट मी सभागृहामध्ये सादर करणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यामध्ये जवळपास एक ते दीड लाख प्रकरणे निघतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तसेच हा प्रकार दुरूस्त करण्यासाठी एका जिल्हाधिकाऱ्याला अधिकार देऊन हे प्रकरण दुरूस्त केले जाईल, असेही ते म्हणाले.
