मुंबई : नायब तहसीलदार ते जिल्हाधिकारी यांनी जनतेला कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ वेळेत भेटावे आणि तसे फलक कार्यालयाबाहेर लावावे, अशी तंबी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिली आहे.

नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी हे क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या कार्यालयात भेटत नाहीत, जनतेची गाऱ्हाणी ऐकत नाहीत, अशा तक्रारी आहेत. परिणामी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी जनतेला मंत्रालयात यावे लागते. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यालयामध्ये भेटावे. तसे सूचना फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे. दुपारी ३ ते ५ या वेळेत दृरदृष्यप्रणालीच्या बैठका टाळाव्यात, अशी तंबी महसूल विभागाने बुधवारी आदेश काढत दिली आहे.

महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामांचा सपाटा लावला आहे. अनेक प्रलंबित विषय त्यांनी मार्गी लावले आहेत. महसूल विभागात शासनाची प्रतिमा लोकभिमुख करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली आहे. महसूल विभागाची सर्वाधिक क्षेत्रीय कार्यालये असून जनतेशी थेट संबंध या विभागाचा येतो. मात्र अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात, अशा मोठ्या संख्येने तक्रारी होत्या. त्यामुळे जनतेला भेटण्यासाठी महसूलच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वेळ राखून ठेवण्याबाबत बजावण्यात आले आहे.

तलाठ्यांचे काय ?

महसूल यंत्रणेत तलाठी हा गावपातळीवरचा कर्मचारी आहे. तलाठी गावात भेटत नाही, तो कार्यालयात बसत नाही, अशा सर्वत्र तक्रारी आहेत. त्याचा उल्लेख मात्र या शासन निर्णयामध्ये केलेला नाही. विभागाच्या वतीने दरवर्षी महसूल पंधरवडा साजरा केला जातो. त्यादरम्यान असे अनेक उपक्रम सुरु होतात. मात्र त्याचे पुढे काही होत नाही, असा अनुभव आहे.