Premium

“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…

“ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो”, असं वक्तव्य भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Pankaja Munde
पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. (PC : Pankaja Munde Facebook)

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी अलिकडेच राज्यभर शिवशक्ती यात्रा काढून शक्तीप्रदर्शन केलं. परंतु, ही यात्रा आटोपल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्याने पुन्हा उभारी घ्यावी यासाठी पंकजा मुंडे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांशीदेखील संपर्क साधला होता. परंतु, तरीदेखील पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई झाली आहे. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (२६ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत पंकजा मुंडे म्हणाल्या, ईश्वर करो आणि माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ न येवो. माझ्याबद्दल कोणीही अफवा पसरवू नये. जसं विवाहबंधन असतं तसंच आपल्या संघटनेशी आपलं एक बंधन असतं. आपण नकळत एकमेकांना वचन दिलेलं असतं, शब्द दिलेले असतात. आपण विचारधारेवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळे तशा प्रकारचा निर्णय कोणत्याही व्यक्तीसाठी वेदनादायी असतो. माझ्यासाठी ते आणखीनच वेदनादायी असेल. कारण मी माझ्या वडिलांना या संघटनेत पाहिलं आहे. त्यामुळे या संघटनेशी माझं वेगळं नातं आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर येऊच नये, अशी माझी प्रार्थना आहे.

हे ही वाचा >> “मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतोय”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर आता भारतीय जनता पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे नेहमीच भेटतात, माझ्याशी चर्चा करतात. मला असं वाटतंय की त्यांच्या बोलण्याचा काहीतरी विपर्यास केला जातोय. पुन्हा एकदा असं होतंय. पंकजा मुंडे आयुष्यात कधीही वेगळा विचार करू शकत नाहीत. पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे भाजपाच्या वाढीसाठी दिलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या आमच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्याबद्दल कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये आणि आपणही (प्रसारमाध्यमे) कोणताही गैरसमज करून घेऊ नये.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrashekhar bawankule says pankaja munde speech distorted asc

First published on: 27-09-2023 at 17:20 IST
Next Story
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान