संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे जंतरमंतरवर, संसद भवन परिसरात आंदोलकांचा मोठा उद्रेक पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बावनकुळे काय म्हणाले?
जंतरमंतरवरील आंदोलनावर आणि विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागण्यांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “कॉक्रोच-वॉक्रोचचं हे आंदोलन म्हणजे म्हणजे मोदी आणि फडणवीसांना बदनाम करण्यासाठी रचलेली नौटंकी आहे,” असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
“सध्या जे आंदोलन सुरू आहे, ती निव्वळ नौटंकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठीच हा सगळा बनाव रचला जात आहे. काही तरुण केवळ मनस्तापामुळे यात सहभागी होत आहेत. पण मला सांगा, हा पेपर काय बावनकुळे किंवा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फोडला आहे का? तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर नक्की सुचवा, पण थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हे निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे.” – चंद्रशेखर बावनकुळे
जंतरमंतरवर तरुणांचा महापूर
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन रविवारी अधिकच चिघळलं. जंतरमंतरवर तरुणांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. ऐतिहासिक शेतकरी आंदोलनानंतर ल्युटन्स दिल्लीत अशा प्रकारचा प्रचंड जनसमुदाय आणि आक्रमक वातावरण पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया दिल्लीकर व्यक्त करत आहेत.
संसदेवरील मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. एका बाजूला संसदेच्या आत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर आंदोलकांचा एल्गार पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ल्युटन्स दिल्लीत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
संसदेवरील मोर्चात जाऊ द्या; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र
“माझं आरोग्य पूर्णपणे व्यवस्थित असून सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आहेत. त्यामुळे मला किमान तात्पुरती तरी रुग्णालयातून सुट्टी द्यावी, जेणेकरून मला संसदेवर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होता येईल,” अशी विनंती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे. त्यांनी स्वतः पत्र लिहून ते रुग्णालय प्रशासनाला सोपवलं आहे.
