भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे देवेंद्र फडणवीस यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. त्यांनी आधी स्वत:च्या मतदारसंघात बघावं, मग इतरांवर टीका करावी, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा – “माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“नाना पटोले यांनी स्वत:च्या जिल्ह्यात जाऊन आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, हे बघितले पाहिजे. शेतकऱ्यांचे धानाचे बोनस महाविकास आघाडी सरकारने देऊ केले होते. ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यांच्या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्याकडे त्याकडे नाना पटोले यांनी लक्ष द्यावं, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात आणि मुख्यमंत्री असताना, जी विकासकामे केली, त्याची एक टक्का बरोबरीसुद्धा नाना पटोले करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना वर्ध्याची तसेच महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती आहे. देवेंद्र फडणवीस संपूर्ण अभ्यास केलेले नेते आहेत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान

उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला?

दरम्यान, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली. “आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आणि आपला मुलगा उपमुख्यमंत्री हेच दिसले. आताही मुंबईत कोणत्याही बॅनरवर बघितलं तर चारच फोटो आहेत. पाचवा फोटो तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर ही परिस्थिती आली आहे. त्यांचे ४० आमदार सोडून गेले. १२ खासदार सोडूनही गेले, हे कशामुळे होत आहे, तर ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’ एवढच त्यांचा हेतू आहे. उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणताही कार्यकर्ता राहायला तयार नाही. आता त्यांच्या स्टेजवर तुम्हाला चारच लोक दिसतील पाचवा व्यक्ती दिसणार नाही, ही वेळ एक दिवस नक्कीच येणार आहे” , असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.