scorecardresearch

चांगभलं : शाळा सुटल्यानंतर भरते ‘पुस्तकांची शाळा’

मुलांना वाचनाकडे वळवण्यासाठी पुस्तकप्रेमी निवृत्त शिक्षकाचा उपक्रम

दिगंबर शिंदे

सांगली : समाजमाध्यमातून धो-धो वाहत येणाऱ्या आभासी दुनियेपासून मुलांना वाचविण्यासाठी आणि त्यांच्यात वाचनाची गोडी लागावी यासाठी तासगाव तालुक्यातील खुजगावच्या एका निवृत्त शिक्षकाने चालतं-बोलतं ग्रंथालय शाळकरी मुलांसाठी सुरू केलं आहे. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर शाळेसमोर मुलांसाठी पुस्तकांचा खजिना घेऊन बसणारा हा शिक्षक मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी कविता आणि गद्य वेचेही त्यांच्याकडून वाचून घेतो.

तासगाव – सावळज रस्त्यालगत तालुक्याच्या पूर्व भागात विकासापासून कोसो दूर असलेलं दोन-अडीच हजार लोकवस्तीचं म्हणजे सातशे उंबऱ्यांचं खुजगाव. रस्त्यालगत असलेली शाळा सुटली की रस्त्याच्या पलीकडे कधी मारुतीच्या देवळाबाहेर, तर कधी शाळेच्या आवारात एका आजोबांची पुस्तकांचा पसारा रस्त्यावरच मांडण्याची लगबग आणि मुलांची पुस्तक चाळण्याची लगबग सुरू होते. शाळा सुटल्यावर लगेच घराकडे जाण्याची ना पोरांना घाई ना पुस्तक मांडणाऱ्या आजोबांना. दिवेलागण होईपर्यंत ही पुस्तकांची शाळा सुरू राहते.

शाळेबाहेरच्या रस्त्यावर पुस्तकांचा पसारा मांडून विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या जगाकडे आकर्षित करणाऱ्या या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे शिवाजीराव देशमुख. ते निवृत्त शिक्षक आहेत. शाळकरी मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी निवृत्त होईपर्यंत प्रयत्न केले, पण निवृत्तीनंतरही त्यांनी हे तसेच अविरत सुरू ठेवले आहे. स्पर्धा परीक्षेसाठी खेड्यापाड्यातील मुलांनीही तयारी करावी, त्यांनाही पुस्तकांचे अनोखे जग माहीत व्हावे या उद्देशाने देशमुख गेली चार वर्षे हा पुस्तकांचा पसारा देवळापुढे मांडत आले आहेत. त्यांच्या या संग्रहात त्यांनी स्वत: खरेदी केलेली दीड हजार पुस्तकंही आहेत.

झुपकेदार मिशा, रागीट चेहरा, मात्र मधुर वाणी असणारे देशमुख सर पुस्तकं आणि पोरांच्या गराड्यात रंगून जातात. शाळा सुटली की काही पोरांना ते पुस्तकं दाखवत असतात, तर काहींकडून कविता म्हणवून घेत असतात. कथा, कविता, गोष्टी, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं अशा पुस्तकांसोबत त्यांच्या पोतडीत मुलांसाठी खाऊसुद्धा असतो.

देशमुख यांनाही चांगलं वाचण्याबरोबर दिसामाजी काही तरी लिहिण्याचीही ऊर्मी आहे. त्यांनी ‘पडवी’, ‘गावाकडे बापू’ या दोन कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. गावातल्या पोरांना चांगलं वाचायला मिळायला हवं या तळमळीतून त्यांनी स्वखर्चाने पुस्तकं खरेदी केली आहेत.

गावकुसातील माणसांनी प्रारंभी त्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्या सर्वांकडं दुर्लक्ष केलं. २०१४ पासून त्यांनी त्यांच्यापरीने वाचनसंस्कृती चळवळ उभी करण्याचा प्रयत्न अविरतपणे चालू ठेवला आहे. प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती त्यांच्या ग्रंथालयात आहेत. शाळा सुटल्यानंतर भरणाऱ्या या पुस्तकांच्या शाळेची तालुक्यात चर्चा आहे.

पुस्तकाचा आशय सांगा बक्षीस मिळवा

एका विद्यार्थ्याला १५ दिवसांसाठी पुस्तक घरी नेण्यासाठी दिले जाते. त्याने पुस्तक वाचले आहे की नाही याची पडताळणीही केली जाते. जर पुस्तकाचा आशय विद्यार्थ्याला सांगता आला तर त्याला चॉकलेटचे बक्षीस ठरलेले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Changbhala after school time separate special school starts for books only asj

ताज्या बातम्या