आसाराम लोमटे

बारव म्हणजे पायऱ्यांची दगडी विहीर. पण या पायऱ्या सुद्धा अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण. काळ्याकभिन्न दगडात अनेक ठिकाणी पारंपरिक जलव्यवस्थापनाचा नमुना म्हणून या बारव पाहायला मिळतात. प्रत्येक बारवेची रचना वेगळी, पण काळाच्या ओघात हा वारसा नष्ट व्हायला लागला. कित्येक बारवा बुजून त्या ठिकाणी नवी बांधकामे उभी राहू लागली, तर काही बारव अतिक्रमणाने वेढल्या. मात्र आता परभणी जिल्ह्यात बारवांच्या संवर्धनाच्या मोहिमेने वेग घेतला असून यात तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…

परभणी जिल्ह्यात अशा बारवांचे पुनरुज्जीवन करण्याचे अभियान लोकसहभागाच्या बळावर उत्स्फूर्तपणे सुरू आहे. सकाळी ६ वाजता गावातले तरुण एकत्र येतात. बारवेतील गाळ, काडी- कचरा काढण्याचे काम श्रमदानातून करतात. आज जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या अडगळीला गेलेल्या बारवा यानिमित्ताने लखलखीत झाल्या आहेत. त्याचबरोबर बारवांचे विलोभनीय स्थापत्यही डोळ्याचे पारणे फेडत आहे.

विहीर, बारव हे आपल्याकडे पाण्याचे स्त्रोत. त्यात वैशिष्ट्यपूर्ण दगडी बांधकामामुळे बारवा लक्ष वेधून घेतात. अनेक ठिकाणी अशा बारव आहेत, पण कालांतराने त्यात गाळ साचत गेला… काडी कचरा साठत गेला. हळूहळू त्या पूर्णपणे बुजून गेल्या. त्यांच्या आजूबाजूला झाडेझुडपे वाढत गेली. कित्येक ठिकाणी तर दुरून ओळखताही येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. जलव्यवस्थापनाचा हा पारंपरिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे बारवांचे संवर्धन करण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे.

या कामी पुढाकार घेणारे मल्हारीकांत देशमुख म्हणाले, की राणी सावरगाव (तालुका गंगाखेड) या ठिकाणी असलेली समुद्र विहीर स्वच्छ करण्याच्या मोहिमेतून या कामाचा प्रारंभ झाला. तेथील समुद्र विहीर या नावाने असलेली बारव दिसतही नव्हती. आता गाळ उपसल्यामुळे तिच्यातले स्वच्छ पाणी दिसू लागले आहे. अलीकडेच पेडगाव येथील बारवेतला गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. बावीस दिवस हे काम चालले. गावातल्या तरुणांनी श्रमदानातून हे काम पूर्ण केले. मानवत येथील अमरेश्वर या प्राचीन शिवमंदिर परिसरात मोठी बाग होती, पण बारवेभोवती प्रचंड झाडे झुडपे होती. गाळ, मातीने भरलेल्या या बारवेच्या पुनरुज्जीवनासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. सोळा दिवस हे काम चालले. या ठिकाणच्या श्रमदानात आमदार मेघना बोर्डीकर याही सहभागी झाल्या. कासापुरी (तालुका पाथरी) येथील बारव याच पद्धतीने स्वच्छ करण्यात आली. सेलू तालुक्यातील वालूर या ठिकाणी असलेल्या बारवेतील गाळ आणि कचरा काढून टाकल्यानंतर त्याठिकाणी आता बारवेचे जे रूप दिसत आहे ते अत्यंत विलोभनीय आहे. स्थापत्याचा तो एक अद्वितीय नमुना ठरावा. पायऱ्यांची अनोखी घडण केवळ अप्रतिम अशी आहे. या ठिकाणचे श्रमदान हे रात्री अक्षरशः दिव्यांच्या लख्ख उजेडात करण्यात आले.

सध्या या सर्व बारवांच्या पुनरुज्जीवनात तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. दररोज सकाळी दोन तास श्रमदान केले जाते. गावकरी, स्थानिक कार्यकर्ते यात हिरिरीने सहभाग घेतात. सध्या या कामी जिल्ह्यात किमान दीडशे तरुण सहभागी असल्याची माहिती मल्हारीकांत देशमुख यांनी दिली. वालूरनंतर जिंतूर, भोगाव, बोरकिनी या ठिकाणी बारवांना स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.

बारव बचाव मोहीम या नावाने सध्या सुरू असलेले हे अभियान पुढे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी राबवले जाईल. जिल्ह्यातील चारठाणा हे गाव अशा अनेक स्थापत्त्यांचा समृद्ध वारसा असणारे आहे. वेरूळ, होट्टल या ठिकाणच्या महोत्सवाच्या धर्तीवर चारठाणा फेस्टिवल घेण्यात येईल असेही देशमुख यांनी सांगितले.