नागपूर जिल्ह्यातील उमरेडजवळचे पाचगाव. अनेक गोरगरीब महिला दगडखाणीत काम करत होत्या; पण जगण्यासाठी संघर्ष करताना रोज कणाकणाने मरत होत्या. त्यांचे आरोग्यच धोक्यात येत होते. हे लक्षात येताच अनेक जणींनी खाणकाम सोडले. शेतीमध्ये मजूर म्हणून राबू लागल्या, घाम गाळू लागल्या. मात्र तेथे दिवस-रात्र राबूनही पुरेसा मोबदला मिळेना…पण आता मात्र पाचगावातील शेकडो महिला स्वावलंबी झाल्या आहेत. नेमके काय घडले..? …आणि कसे घडले?
पाचगाव हे नागपूरपासून ३० किमी अंतरावरचे गाव. त्याच्या सभोवती अनेक दगडखाणी, अखंड होणारी ट्रक वाहतूक, त्यांतून उडणारी धूळ, दगडखाणीतील धूलिकणांमुळे होणारे आजार… गावकरी त्रस्त. पाचगाव आणि आजूबाजूच्या गावांतील अनेक गोरगरीब महिला खाणीमध्ये काम करीत होत्या. आरोग्य धोक्यात घालत होत्या. पर्यायी रोजगार नव्हता. कामाच्या ठिकाणी सोयीसुविधांचाही अभाव होता. जगण्याच्या धडपडीत आपले जगणेच धोक्यात येत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. अनेक जणींनी खाणकाम सोडले.
महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांच्या हाताला रोजगार देणे आणि त्यातून गाव समृद्ध करणे या उद्देशाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून हातमाग उद्योग (क्लस्टर) सुरू करण्यात आले. खाणी आणि शेतीमध्ये काम करणाऱ्या ३०० हून अधिक महिलांना कापड उद्योगासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. एक ते दीड महिन्याच्या प्रशिक्षणादरम्यान कापड तयार करणे, त्याला रंग देणे इत्यादी कामांची माहिती त्यांना देण्यात आली. आज तीनशेपैकी शंभर महिलांच्या हाताला हातमाग कापड उद्योगातून रोजगार मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोना साथीमुळे अनेक कुटुंबांच्या घरातील कमावत्यांचा रोजगार हिरावला गेला; परंतु या महिलांनी मात्र करोनाच्या संकटातही काम केले. शंभरहून अधिक महिलांनी टाकाऊ कापडापासून आकर्षक चटया, सतरंज्या, गालिचे, चादरी तयार केल्या. आज केवळ विदर्भात नाही तर देशातील विविध बाजारपेठांमध्ये या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना मागणी आहे. दिवसाला शंभर ते दीडशे रुपये मजुरी मिळवणाऱ्या महिला आज महिन्याकाठी दहा ते १५ हजार रुपयांची कमाई करून संसाराचा गाडा चालवत आहेत.
बुटीबोरी आणि सुरत येथील कापडगिरण्यांतील कापड या महिलांना नि:शुल्क उपलब्ध करून दिले जाते. त्यातून त्या सोफा कव्हर, कार सीट कव्हर, चटया, सतरंज्या, गालिचे, चादरी तयार करतात. नागपुरात नुकत्याच झालेल्या ‘ॲग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी होती, मात्र तेवढा पुरवठा त्या करू शकल्या नाहीत.
हेही वाचा : चांगभलं : वन्यजीवांचा सांभाळ आणि दुर्मीळ वनस्पतींची रोपवाटिकाही
पाचगावच्या या उद्योगात सध्या १५ यंत्रांवर (लूम्स) काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत आणखी ५० यंत्रे बसवण्याचे नियोजन आहे. मात्र तेथे जागेची कमतरता आहे. एकावेळी ३० ते ४० महिला काम करू शकतात, अशी व्यवस्था आहे. पाचगावमधील हातमाग कापड उद्योगाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता निहारवाणी (ता. मौदा), गुमथळा (ता. कामठी), रिधोरा (ता. काटोल), बोरखेडी रेल्वे (नागपूर ग्रामीण), वरोडा (ता. कळमेश्वर) याही गावांतील महिलांना रोजगार देण्यासाठी हातमाग उद्योग सुरू करण्यात येणार आहेत.