scorecardresearch

चांगभलं : बहे गावाची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल

सांगलीतल्या या गावात दहा रुपये किलोने प्लास्टिक खरेदी करून ते पुनर्वापरासाठी विक्री करण्याची योजना गेल्या महिन्यापासून राबवण्यात येत आहे

दिगंबर शिंदे

सांगली : जळीस्थळी आढळणाऱ्या आणि जगासमोर प्रदूषणाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळविण्याचा संकल्प कृष्णाकाठच्या बहे गावाने सोडला होता. या गावात दहा रुपये किलोने प्लास्टिक खरेदी करून ते पुनर्वापरासाठी विक्री करण्याची योजना गेल्या महिन्यापासून राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अवघ्या एका महिन्यात गावाचे रूपडेच पालटले आहे.

इस्लामपूर-ताकारी रोडवर असलेले बहे गाव. कृष्णा नदीतील रामलिंग बेटावर असलेल्या समर्थ स्थापित मारुतीमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेेले चार हजार लोकवस्तीचे गाव. छायाताई पाटील या गावाच्या सरपंच आहेत. लोकसंख्या चार हजार असली तरी गावात ८५५ उंबरा आहे.

लहान मुलांसाठी खाऊ म्हणून दुकानात पाच-दहा रुपयाला मिळणारी कुरकुरेची पाकिटे असोत वा किराणा दुकानातून आणलेली साखरेची प्लास्टिकची एक वेळ वापराची पिशवी असो. काम झाले की ती रस्त्यावर किंवा गटारात टाकली जात होती. यामुळे गटारे तुंबत होती. पाण्याचा निचरा तर होत नव्हता. पण प्लास्टिक प्रदूषणाचे डोंगर मात्र गावाभोवती तयार होत होेते. ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ही सर्व घाण गोळा करत घंटागाडीद्वारे गावाबाहेर टाकावी लागे. गावात स्वच्छता झाली तरी प्लास्टिकचा कचरा अन्यत्र कुठे तरी साचून नव्या समस्या उभ्या करत होते.

या प्लास्टिकमुळे ओला कचरा लवकर कुजत नव्हता. प्लास्टिक जाळून नष्ट करणे हा उपाय पुन्हा पर्यावरणाला धोका निर्माण करणारा आणि दुर्गंधी पसरवणारा होता. या प्लास्टिकचे काय करायचे, हा प्रश्न आ वासून होता. पावसाळ्यात गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी साचून राहत होते. डासांचा प्रादुर्भाव बारमाही सतावत होता. त्यात गावाची जमीन नदीकाठची. म्हणून पाणी मुरण्याचे प्रमाण कमी. गावात चार महिने तर आरोग्याचे प्रश्न डोके वर काढायचे.

अन्य गावांप्रमाणे बहे गावसुद्धा प्लास्टिकग्रस्त झाले होते आणि काय करावे सुचत नव्हते. दरम्यान, वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार भेटीसाठी गावात आले. त्यांनी ही समस्या कायमची सोडविण्यासाठी प्लास्टिक संकलन करण्याची सूचना केली. ही सूचना सरपंच श्रीमती पाटील, राजाराम बापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, रामराव पवार, ग्रामसेवक सागर मोकाशी यांनी अमलात आणण्याचा निर्णय घेतला.

दर महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला गावातील लोकांकडून दहा रुपये प्रतिकिलो दराने प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. वजन करून जागेवरच पैसेही मिळतात म्हटल्यावर लोकांनी प्लास्टिकच्या पिशव्या, खेळणी आदी टाकाऊ वस्तू ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यास सुरुवात केली. जानेवारीच्या ३० तारखेपासून ही योजना सुरू करण्यात आली. पहिल्या आठवड्यात १०० किलो प्लास्टिक जमा झाले. आता दर १५ दिवसांनी १५ ते २० किलो प्लास्टिक ग्रामस्थांकडून जमा होते.

छायाताई पाटील, सरपंच, बहे – ग्रामपंचायतीच्या कचऱ्यातून प्लास्टिक गायब झाल्याने आता ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीचा मानस आहे. त्या दिशेने पंचायतीची वाटचाल सुरू आहे.

ग्रामस्थांच्या वर्तनात बदल

ग्रामपंचायतीने प्लास्टिक संकलन सुरू केल्यामुळे बहे गावातील ८० टक्के प्लास्टिकची समस्या निकाली निघाली आहे. ग्रामस्थही चार पैसे मिळू लागल्याने रस्त्यावर, घराशेजारी प्लास्टिक न फेकता ते जमा करून ठेवू लागले आहेत. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या वर्तनात बदल घडवून आणल्याने प्लास्टिकची समस्या सुटू लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Changbhala sangali bahe village initiative about dispose of plastic waste asj

ताज्या बातम्या