सावंतवाडी : कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा पिकाला यावर्षी बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला आहे. देवगड तालुक्यात मोहर येऊनही अत्यल्प फळधारणा झाल्याने बागायतदार हवालदिल झाले असून, या संकटातून सावरण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचवल्या आहेत.
नोव्हेंबर अखेरीस देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, हा मोहर प्रामुख्याने ‘पालवी मोहर’ होता आणि तो आकाराने लांब होता. १० ते १५ डिसेंबर दरम्यान तापमानात मोठी तफावत दिसून आली. किमान तापमान १३ ते १५ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान ३२ ते ३५ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.
या मोठ्या फरकामुळे मोहरामध्ये नर फुलांचे प्रमाण वाढले. परिणामी, परागीभवन (Pollination) योग्य रितीने न झाल्यामुळे फळधारणा झाली नाही. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आलेल्या दुसऱ्या बहरातही फळधारणेचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. सध्या अनेक ठिकाणी झाडांवर केवळ मोहराचे वाळलेले दांडे शिल्लक आहेत.
बागायतदारांना दिलासा देण्यासाठी देवगड तालुका कृषी अधिकारी श्रीम. आरती पाटील आणि आंबा संशोधन उपकेंद्र (रामेश्वर) चे प्रभारी अधिकारी डॉ. अजय मुंज यांनी तांत्रिक सल्ला दिला आहे. झाडावर शिल्लक असलेले जुने मोहराचे दांडे शक्य तितक्या लवकर खुडून टाकावेत, जेणेकरून नवीन मोहर येण्यास मदत होईल.बागेत संध्याकाळच्या वेळी काडीकचरा पेटवून धूर करावा. यामुळे थंडीचा प्रभाव कमी होऊन नवीन मोहरात फळधारणा होण्याची शक्यता वाढते. मोठ्या प्रमाणात मोहर येऊन गेल्याने झाडांमधील अन्नद्रव्ये कमी झाली आहेत. त्यामुळे फवारणीद्वारे योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. ज्या झाडांना फळधारणा झाली आहे, त्यांना दर १५ दिवसांनी १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाच्या मुळाशी गवताचे आच्छादन करावे. यामुळे पाण्याचा ताण कमी होऊन फळगळ थांबण्यास मदत होईल. ”हवामानातील बदलांमुळे सध्या स्थिती कठीण असली तरी, योग्य व्यवस्थापन आणि खत-पाण्याचे नियोजन केल्यास पुढील टप्प्यात सुधारणा होऊ शकते.” असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

