या लोकसभा निवडणुकीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माध्यमांनी मतदारांना ठगवले, अशी नोंद त्यात होईल. देशात जनसंपर्क क्षेत्रात पहिल्यांदा एवढा मोठा अनाचार घडत असल्याचा दावा आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी केला. विशेषत: भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी माध्यमांमधले तज्ज्ञ शोधून प्रचाराची मोठी यंत्रणा उभारली, असेही यादव म्हणाले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार सुभाष लोमटे यांच्या प्रचारार्थ यादव येथे आले होते. देशभरातील पत्रकार व माध्यमे यात फरक करायला हवा. पत्रकारांची विचारसरणी वेगळी आणि माध्यमांची वेगळी. जेवढा जाहिरातीवर भाजपने खर्च केला, त्याची आकडेवारी भविष्यात त्यांना विचारली जाणार आहे का? माध्यमांचे मालक-व्यवस्थापक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण कोणत्या माध्यमाची व्यक्ती कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे, हे समजू शकेल काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मुकेश अंबानी यांच्याविरोधात आम आदमी पार्टीने आवाज उठविला, तेव्हापासून या पक्षाच्या माध्यमांतील जागा आणि वेळेमध्ये फरक पडला आहे. काही भांडवलदारांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा ठेका घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीची नोंद वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागेल, असेही यादव म्हणाले.
औरंगाबादसह राज्यात सर्वत्र निवडणूक यंत्रणा आम आदमी पार्टीच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. जालना येथील आपचे उमेदवार म्हस्के म्हणाले की, उमेदवारी अर्ज दाखल करताना बैलगाडी वापरली होती. त्या बैलांना चारा कोठून आणला, त्याचीही पावती द्या, अशी मागणी करण्यात आली. औरंगाबादमध्ये एका कार्यकर्त्यांला रात्री शिवसेनेकडून धमकावले गेल्याचे सांगण्यात आले. आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी होऊनही त्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असाही आरोप या वेळी करण्यात आला. तशा तक्रारी निवडणूक निरीक्षकांकडेही लेखी स्वरूपात नोंदविल्याचे सांगण्यात आले. लोमटे यांनी निवडणुकीतील जाहीरनामाही या वेळी माध्यमांपर्यंत पोहोचविला.