Chembur Trree Collapse on School Van latest update : चेंबूर येथील डायमंड उद्यानाजवळ मंगळवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तास उलटून गेल्यावरही त्याची आई हातात मुलाची क्रिकेटची बॅट घट्ट धरून बसली होती आणि मुलगा रोजच्यासारखा खेळून परत येईल या आशेवर ती बसली होती. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या भीषण अपघातात विहानचा जागीच मृ्त्यू झाला असून इतर चार मुले जखमी झाली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, त्याची आई जुही हातात क्रिकेटची बॅट घेऊन शून्य नजरेने बसलेली दिसत आहे. शेजारी तिला सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
विहान समजूतदार आणि हुशार मुलगा
“फक्त जुहीच तिच्यावर ओढवलेल्या या दुःखाचं वर्णन करू शकते. विहान अनेकदा आमच्या घरी यायचा आणि मला सांगायचा, ‘काकू, मला क्रिकेट खेळायचे आहे.’ तो म्हणायचा, ‘कृपया देवला मला क्रिकेट शिकवायला सांगा.’ तो खूप समजूतदार, हुशार आणि चांगल्या संस्कारांचा मुलगा होता आणि क्रिकेटपटू बनणं हे त्याचं स्वप्न होतं”, असं राजी मल्होत्रा यांनी सांगितलं. त्या विहानच्या शेजारी आहेत.
-
विहानचे आईवडील (फोटो – अमित चक्रवर्ती)
विहानला क्रिकेट खेळायला जायचंय
“विहानच्या आईचा त्याच्यावर खूप जीव होता. तोच तिचं संपूर्ण जग होता. तिला त्याची सतत काळजी वाटायची. विहान घराबाहेर गेला की ती त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दिवसभर त्याला व्हिडिओ कॉल करायची. अगदी आतासुद्धा ती तिथे बसून त्याची क्रिकेटची बॅट हातात धरून आहे. विहान आता या जगात नाही, हे स्वीकारणं तिच्यासाठी खूप कठीण झाले आहे. ती अजूनही सारखी म्हणत आहे की विहानला क्रिकेट खेळायला जायचं आहे”, असं शेजाऱ्यांनी पुढे सांगितले.
“ही घटना विहानच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर घडली. बस विहानला पुढे सोडणार होती आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली”, असं श्रीवास्तव कुटुंबाचे मित्र आणि शेजारी तुकाराम काटे यांनी मंगळवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं. विहान हा या जोडप्याचा एकुलता एक मुलगा होता.
विहानची आई जुही टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि वडील गौरव एका सरकारी पेट्रोलियम कंपनीत कामाला आहेत. हे कुटुंब चेंबूर (पश्चिम) येथील कुकरेजा रेसिडेन्सीमध्ये राहते आणि तीन वर्षांपूर्वी ते दिल्लीहून येथे राहायला आले होते.
चेंबूरमध्ये नेमकं काय घडलं?
मंगळवारी दुपारी बसवर झाड कोसळलं त्यावेळी बसमध्ये १३ मुलं प्रवास करत होती. बसचा वाहक आणि तेथून जाणाऱ्या नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. पाच विद्यार्थ्यांना जवळील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तिथं विहानला मृत घोषित करण्यात आलं. हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितलं की, इतर चार जखमी मुलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यातील दोघांवर सीटी स्कॅन (CT Scan) सह इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनीही हॉस्पिटलला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. “ही घटना अतिशय वेदनादायक आहे. मी इथे एक आई म्हणून आले होते. पालक पूर्णपणे निःशब्द झाले होते. युनिव्हर्सल स्कूलच्या बसमध्ये १३ मुले होती, त्यापैकी १२ सुरक्षित आहेत, पण एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला”, असं त्या म्हणाल्या.
