Tree Collapse Accident in Chembur, Vihan Shrivastava Parents Reaction: जून महिन्याच्या अखेरीस मुंबईत मुसळधार पाऊस पडून अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात आपल्या एकुलत्या एक मुलाला गमावल्यानंतर विहान श्रीवास्तवचे पालक विस्कळीत झालेले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसह विहानचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न जिवंत ठेवण्याबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
द इंडियन एक्सप्रेसने श्रीवास्तव दाम्पत्याशी विस्तृत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “आमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आमच्या मुलाभोवतीच केंद्रित होती. आमची दिनचर्या, त्याची शाळा आणि अगदी आमच्या सुट्ट्यांचे नियोजनही आम्ही त्याच्यानुसारच करत होतो. आता तोच राहिला नसल्याने, आम्ही आमच्या जीवनाचा उद्देश नव्याने शोधत आहोत”, अशी भावना श्रीवास्तव दाम्पत्याने व्यक्त केली.
‘तर आम्ही न्यायालयात जाऊ’
मुंबई मनपाच्या पहिल्या अहवालाबाबत बोलताना विहानचे पालक म्हणाले, प्राथमिक चौकशीचे निष्कर्ष धक्कादायक आणि स्वीकारण्याजोगे नव्हते. आम्ही या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. तसेच दोषींवर जबाबदारी निश्चित न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

“ही दुर्घटना घडली तेव्हा लगेचच चौकशी समिती स्थापन करण्यात आली. हा वेग पाहता आम्हाला थोडे हायसे वाटले. मात्र या अहवालात संपूर्ण खापर केवळ कंत्राटदारांवर फोडण्यात आले. योग्य त्या उपाययोजना न केल्याबद्दल संबंधित विभाग जबाबदार असूनही त्यांच्यावर कारवाई न करता क्लीन चीट दिली गेली. या सर्व प्रकारामुळे आमच्या मनात प्रचंड संताप आहे,” असे विहानचे वडील गौरव श्रीवास्तव यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
गौरव श्रीवास्तव पुढे म्हणाले की, जर जबाबदारी निश्चित केली गेली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाईचा विचार करू. “योग्य दिशेने कारवाई होत नाही असे जर आम्हाला वाटले तर आम्ही कायदेशीर मार्गाचाही विचार करू.” याशिवाय अपघात झाल्यापासून मनपाच्या एकाही अधिकाऱ्याने कुटुंबाशी संपर्क साधला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

अपघात कसा घडला?
३० जून रोजी चेंबूरच्या सुभाष नगरमधील रस्ता क्र. ११ वरून विहान युनिव्हर्सल हायस्कूलमधून इतर ११ विद्यार्थ्यांबरोबर शाळेच्या व्हॅनने घरी परतत होता. त्यावेळी व्हॅनवर एक मोठे पिंपळाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत बहुतांश मुले सुखरूप बचावली, मात्र चार जण जखमी झाले आणि विहानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गौरव भावुक होत म्हणाले, “आम्ही नुकतेच सिंगापूरला पर्यटनासाठी गेलो होतो. आमचे पुढच्या सहलीचे नियोजनही सुरू होते. आमचे संपूर्ण जीवनच विहानभोवती फिरत होते. आता तोच नसल्याने आमच्या जगण्याचा अर्थ नव्याने शोधत आहोत.”
क्रिकेटसाठी इतर मुलांना मदत करणार
“विहानला क्रिकेट खूप आवडत होते. त्याला क्रिकेटर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याला नव्या पिढीतील क्रिकेटपटू खूप आवडायचे. तो क्रिकटचे सामने तर पाहायचाच, पण सामन्याआधी आणि नंतर क्रिकेटवर खूप गप्पा मारायचा. त्याला क्रिकेटची खूप आवड होती आणि तो अभ्यासातही अतिशय हुशार होता”, अशीही आठवण त्याच्या वडिलांनी सांगितली.

विहानच्या कुटुंबीयांनी त्याचे स्वप्न तेवत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. होतकरू आणि गरीब कुटुंबातील मुलांच्या क्रिकेट प्रशिक्षणाचा आणि शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय श्रीवास्तव कुटुंबाने जाहीर केला आहे.
आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरत आहोत. आमचे मित्र आणि नातेवाईक आम्हाचे सांत्वन करत असून आम्हाला आधार देत आहेत. ज्या मुलांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा आहे, त्यांना आम्ही पाठबळ देऊन विहानचे स्वप्न पुढे नेण्याचा प्रयत्न करू” असे गौरव श्रीवास्तव म्हणाले.
