अहिल्यानगर:बागायती शेतजमीनीला जेथे ५० लाख रुपये एकर भाव सुरू आहे, तेथे रेडीरेकनरचा नियम दाखवत केंद्र सरकारने २३ लाख रुपये नुकसान भरपाई दिली. बागायतीला जिराईतीचा दर द्यायला हे सरकार निघाले आहे, शिवाय जमीन व मालमत्तेची रक्कम एकत्र देणे आवश्यक असताना, आधी फक्त जमिनीचे पैसे घ्या, नंतर मालमत्तेची देऊ,’ अशी शेतकऱ्यांना लुटणारी शासनाची भूमिका असेल, तर, शेतकरी ते सहन करणार नाही, शेतकऱ्याच्या घरादारावर नांगर फिरवून महामार्ग होणार असेल, तर हा विकास काय कामाचा?,’ असा संतप्त प्रश्न करत राहुरीतील शेतकऱ्यांनी भूसंपादनाची रक्कम नाकारली.
श्रीरामपूरच्या प्रांत कार्यालयात राहुरी तालुक्यातील सोनगाव परिसरातील पाच गावांतील शेतकऱ्यांना जमिनीच्या नुकसानभरपाईचे वाटप होणाणार होते. शेतकऱ्यांनी ते सामुहिकरित्या नाकारले. या महामार्गासंदर्भात नोव्हेंबर २०२१ मध्ये राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने अधिसूचना काढली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी तसेच घरे, गोठा, शेड, विहीर, फळबागा याचे मूल्यांकन कृषी, महसूल, बांधकाम, वनविभागाने केले. प्रांताधिकाऱ्यांनी या मूल्यांकनाची तपासणी केली.
यात दोन वर्षे गेली. त्यानंतर २०२४ मध्ये भारतमाला योजना बंद झाल्यामुळे हा प्रकल्प थांबवला. शेतकऱ्यांच्या जमिनीवर ‘एनएचआय’चा फेर पडल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे मुश्कील झाले. प्रकल्प रखडल्याने जमिनीची खरेदी-विक्री करता येईना. २०२५ अखेर प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली. २०२६ मध्ये महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली.
परंतु ‘एनएचआय’ने आधी शेतकऱ्यांना केवळ जमिनीचे पैसे देण्याचे ठरवले. जमिनीवरील मालमत्तेचे पैसे पुन्हा तपासणी करून देऊ, असे सांगितले. ते शेतकऱ्यांना मान्य नाही. याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी किरण सावंत यांना निवेदन दिले. सोनगावसह सात्रळ, कानडगाव, कनगर, वांबोरी आदी गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश अंत्रे म्हणाले, कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये द्यायला सरकारकडे पैसे आहेत; इकडे शेतकऱ्याची काळी आई, घरदार उद्ध्वस्त करताना कवडीमोल भाव दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन यांना विकास पाहिजे असेल, तर आम्ही तो होऊ देणार नाही.
नुकसान भरपाईपेक्षा विष द्या
आंदोलक निर्मला तुळशीराम अनाप म्हणाल्या, माझ्या पतीचे निधन झाले आहे. अवघी ३९ गुंठे शेती, त्यात सात गुंठे रस्त्यात जात आहेत. विंधन विहिर, विहीर, सायफन रस्त्यात गेले. नुकसानभरपाई अवघी चार लाखांची. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मी ३०० रु. रोजाने मी शेतात कामाला जाते. उरलेल्या वेळात शेती करते. आता विहीर, कुपनलिका गेल्यामुळे शेती करणार कशी? नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकारने आमची थट्टा लावली आहे. या कवडीमोल पैशापेक्षा आम्हाला विष द्या.
अन्यथा महामार्गाचे स्थलांतर करा
शेतकऱ्यांच्या मागण्या-जमीन व मालमत्तेची नुकसान भरपाई एकत्र द्या, बाजारभावानुसार जमिनीची भरपाई द्या, प्रांताधिकाऱ्यांनी केलेले मालमत्तेचे मूल्यांकन योग्य, तेच स्वीकारा. एक महिन्यात नुकसानभरपाई द्या, अन्यथा महामार्ग दुसरीकडून न्यावा.
शेतकरी उद्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा? नुकसान भरपाई देताना शासन नियम लावत आहे, परंतु नियम शेतकऱ्यांचे भले करणारे असावे, ‘एनएचआय’चा कारभार आणि नियम शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. रस्ते विकास देशाचे भले करणारा असतो, म्हणून आम्ही इतके दिवस शांत होतो; पण शेतकरी उद्ध्वस्त करणारा हा रस्ते विकास काय कामाचा? –लक्ष्मण अंत्रे, अध्यक्ष, महामार्ग संघर्ष समिती
