राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची एक नुकतीच बैठक पार पडली होती. त्या बैठकीत सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दरम्यान, आता वाद झाल्याच्या या चर्चांवर छगन भुजबळ यांनी मोठा खुलासा केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी एकत्र संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या एका बैठकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला. यावर छगन भुजबळ यांनी ‘हम साथ साथ है’, असं म्हणत वाद झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
विधानपरिषदेच्या जागांबाबत सुनील तटकरे काय म्हणाले?
“विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वांनी सर्व जागांबाबत चर्चा केली. विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महायुती म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एकमत झालं आहे. भाजपा कोणत्या जागांवर लढेल? शिवसेना (शिंदे) कोणत्या जागा लढवेल? राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष कोणत्या जागा लढवेल? याबाबत स्पष्टता उद्या दुपारपर्यंत येईल. राष्ट्रवादीला किती जागा हव्यात, याबाबत सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी मांडलेली आहे. आम्हाला सर्वांना जाणीव आहे की १ तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता लवकरच अंतिम घोषणा केली जाईल”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
रायगडमध्ये शिवसेना अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच?
रायगडमध्ये शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला एकत्र सामोरं जात आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या पक्षाला जागा मिळवण्यासाठी आग्रही राहू शकतो. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत, त्यामुळे सन्मानपूर्वक जागावाटप होईल.”
शिवसेनेला रायगडचं पालकमंत्री पद दिलं जाईल का?
रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेला दिलं जाईल आणि विधानपरिषदेची जागा तुम्हाला दिली जाईल अशा चर्चा सुरू आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “याबाबत कोणताही प्रस्ताव कोणीही कोणाला दिलेला नाही. महायुतीमधील जागावाटपाबाबत मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार योग्य निर्णय घेतील.”
राष्ट्रवादीच्या बैठकीतील वादावर भुजबळ काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एका बैठकीत सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, “हम साथ साथ है. आमच्यात काहीही वाद नाही. मात्र, वाद आहे असं पसरवण्याचं काम आपण लोकांनी केलं आहे. आमच्यात काहीही वाद झालेला नाही. मात्र, कोणी बोलत असेल आणि त्याला आपण म्हटलं की थांब-थांब, थोडं लवकर आवर, असं असतं. या पलिकडे काहीही नाही. तुम्ही लोकांनी सांगितलं की आमच्यात वाद आहे आणि आता पाहा हम साथ साथ है”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय काय घडलं होतं?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक पार पडली होती. पण या बैठकीला प्रफुल्ल पटेल उपस्थित नव्हते. बैठकीत सुनील तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना सांगितलं होतं, ज्यानंतर या दोन नेत्यांमध्ये वाद झाला अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तसेच सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेले होते, असंही बोललं जातं.
भुजबळ-तटकरे खडाजंगी कशावरुन झाली?
राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर आणि पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचे समर्थन करत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली होती. अजितदादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना आम्ही दोघेच टिकेचे धनी का? असा सवालही सुनील तटकरेंनी केला होता. सुनील तटकरे यांच्या या मुद्यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. जे झाले ते झाले ते सोडून द्या आता पुढे जाऊया असा सल्ला भुजबळ यांनी तटकरे यांना दिला होता. त्यावरुन दोघात खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.
सुनेत्रा पवार यांनी काय म्हटलं होतं?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना सुनेत्रा पवार यांनी पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंध असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या होत्या, तसंच पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत, २२ आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांमधून पक्षाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं होतं. तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावरही त्यांनी सारवासारव करत, पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असं स्पष्ट केलं होतं.
