scorecardresearch

“पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करू”, भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, “बारामतीच्या नादाला…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामतीच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

“पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करू”, भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, “बारामतीच्या नादाला…”
छगन भुजबळ (संग्रहित छायचित्र )

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांनी बारामती मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केलाय. तसेच बारामतीतील पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करू, असं विधान केलंय. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ यांनी भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये, असं खोचक विधान केलं आहे. ते शुक्रवारी (९ सप्टेंबर) मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये. हे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. वेळेची आणि उर्जेचा अपव्यय आहे. त्यांनी तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी. भलत्यासलत्या ठिकाणी कुठं जात आहात.”

“तुमची उंची किती, त्यांची उंची किती?”

“तुमची उंची किती आहे, त्यांची उंची किती आहे काही तरी विचार करा. मग त्यावर डोकं आपटा,” असं म्हणत छगन भुजबळांनी भाजपावर टीका केली.

“”आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहे”

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत १५० चा नारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणपती मंडळांना भेटीचा सपाटा लावला आहे. याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत. नक्की गणेशदर्शन सुरू आहे की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे.”

“नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही”

“गणपती बाप्पांनी सत्तेत असणाऱ्यांना सुबुद्धी द्यावी. सरकारने घोषणांच्या पलिकडे जाऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत. नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही. हे नवं सरकारच विघ्नहर्ता आहे अशी त्यांनी जाहिरात केली आहे. ते म्हणतात त्यांचं सरकार आलं आणि हिंदू सणांवरील विघ्न कमी झालं. त्यामुळे या विघ्नहर्तापेक्षा तेच विघ्नहर्ता झाले आहेत,” असं म्हणत भुजबळांनी भाजपावर निशाणा साधला.

हेही वाचा : नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? भुजबळांच्या मिश्किल प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची भंबेरी

“आज राज्यात अनेक विघ्न आहेत. ही विघ्न या सरकारने दूर करावीत. बेरोजगारी, महागाई अशा अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. मुसळधार पाऊस पडतो आहे. हेही विघ्न या सरकारने दूर करावीत,” असा सल्लाही भुजबळांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.