देशात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच ही जनगणना झाली तर याचा देशातील ओबीसींना मोठा फायदा होईल आणि त्यांना केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, असेही ते म्हणाले. आज झालेल्या समता परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. हेही वाचा - “नवनीत राणांच्या पराभवासाठी…”, रवी राणांचा गंभीर आरोप; म्हणाले, “बच्चू कडू यांना मातो… नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? “नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. आता आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की त्यांनी जातीनिहाय जनगणना करावी. ती केली तर ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश पडेल. नुसतीच लोकसंख्या समजणार नाही तर ओबीसींची परिस्थितीदेखील आपल्याला समजेल. त्यामुळे केंद्र सरकारकडून मिळणारा निधी, जो आता केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळतोय तो ओबीसींना देखील मिळू शकेल. परंतु, त्यासाठी जनगणना व्हायला हवी”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. “राज्यपातळीवर जनगणना करून फायदा होणार नाही” “जाती जनगणना केवळ राज्यपातळीवर करून फायदा होणार नाही. तर ती देशपातळीवर करावी लागेल. केवळ राज्याच्या पातळीवर ही जनगणना झाली तर आपल्याला फक्त माहिती मिळेल. परंतु, केंद्राचा निधी मिळणार नाही. त्यामुळे केंद्राकडून निधी कशाप्रकारे मिळवता येईल याबाबत आज समता परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकारने जाती जनगणना करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा आम्हाला आनंद होईल, त्यामुळे प्रत्येक समाजाची योग्य संख्या समजणं सोपं जाईल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. “ओबीसींवर अन्याय होत असेल तर योग्य ती पावले उचलू” पुढे बोलताना त्यांनी ओबीसी नेत्यांकडून सुरु असलेल्या उपोषणावरही भाष्य केलं. “राज्यात काही लोक ओबीसींसाठी उपोषणाला बसले आहेत. आम्ही त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही वकिलांशी बोलणार आहोत. काही कागदपत्रेदेखील आम्ही तयार केली आहेत. जर कुठं ओबीसींवर अन्याय होत असेल तर आम्ही त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलू”, असेही ते म्हणाले. हेही वाचा - "शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?" राऊतांचा 'त्या' वक्तव्यावर संताप; म्हणाले, "वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये" “.तर मी स्वत: आंदोलन करेन” दरम्यान, सरकार आमचं ऐकत नाही, अशी तक्रार काही ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. यासंदर्भात बोलताना, “मला आधी माहिती घेऊ द्या, त्यानंतर आपण आपल्या मागण्या सरकारकडे मांडू, त्यानंतरही सरकारने ऐकलं नाही, तर मी स्वत: आंदोलन करेन”, असेही भुजबळ यांनी सांगितलं.