नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोक मुंबईहून बाहेर जाण्याचा पर्याय निवडत आहेत. मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने अनेकांना मे महिन्याच्या सुट्टीतही बाहेर जाता आलं नव्हतं. आता मात्र अनलॉकच्या दरम्यान प्रवासाची मुभा देण्यात आल्याने अनेक लोक मुंबईबाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत मुंबई नाशिक महामार्गावरुन जात असताना महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ घोटी टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यांची कार जेव्हा घोटी टोल नाक्याजवळ आली तेव्हा त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या कारमधून उतरुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हातभार लावला.

 

 

अनेक वाहनांना विना टोल जाऊ देत छगन भुजबळ यांनी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांचं हे रुप टोल नाक्यावरचे कर्मचारी आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चकित करणारंच ठरलं.

छगन भुजबळ स्वतः वाहतूक कोंडी सोडवत असल्याचं लक्षात येताच काहीजण त्यांना मोबाइलच्या कॅमेरातही टीपत होते. जनतेच्या हितासाठी नेत्यांनी रस्त्यावर उतरावं असं जनतेला कायमच वाटत असतं. आज त्याचंच दर्शन लोकांना झालं.

मुंबईतील नाइट कर्फ्यू आणि काही निर्बंध शिवाय शहराच्या धकाधकीपासून दूर जाण्याची इच्छा असल्याने अनेक मुंबईकरांचे पाय नाशिक, लोणावळा, महाबळेश्वर, नाशिक आणि अलिबागच्या दिशेने वळले आहेत. परिणामी काही टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा मिळत आहेत. दोन-तीन तासांच्या प्रवासासाठी अनेकांना जास्तीचे एक-दोन तास घालवावे लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो आहे.