Chhagan Bhujbal NCP Rajya Sabha: राज्यसभेसाठी इच्छुक असणाऱ्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलून राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली. जैन यांनी आज विधिमंडळात अर्ज दाखल केला. यानंतर राज्यसभेसाठी संधी न दिल्याने नाराज असणाऱ्या भुजबळांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. नाराजीवर भाष्य करताना त्यांनी,” मी नाराज नाही, नाराज काय होणार? पण, इतरांना जो न्याय मिळाला तोच न्याय मलासुद्धा मिळाला पाहिजे, ही मागणी होती”, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, ‘मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हू’, असे सूचक वक्तव्य देखील केले.

नाराजीच्या वृत्तांबाबत काय म्हणाले भुजबळ?

“भाजपकडे माझा प्रस्ताव मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा एक दिवसच उरला होता. त्यावर भाजपकडून असं उत्तर आलं की, ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्याचा विचार करु. त्यामुळे भाजपने माझा प्रस्ताव नाकारला, यामध्ये तथ्य नाही. मी नाराज नाही. इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत, त्यांची मुलबाळं मंत्री आहेत, मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती”, असे छगन भुजबळ पक्षाने राज्यसभेची उमेदवारी का दिली नाही? तसेच नाराजीच्या वृत्तावर बोलताना म्हणाले.

हम शतरंज के खिलाडी नही है – भुजबळ

अन्याय झाला आहे का? असा देखील प्रश्न यावेळी भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना, “चालायचंच. आज नाही तर कल, कल नही तो कल… “मैं कबड्डी का खिलाड़ी हूं, शतरंज का नहीं,” असे सूचक वक्तव्य देखील भुबळांनी यावेळी केले. दरम्यान, छगन भुजबळ राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी इच्छुक होते. पण, राज्यसभेवर जाण्याकरिता त्यांनी स्वत:चे मंत्रिपद समीर भुजबळ यांना देण्याची अट ठेवली होती. पण, भाजपाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले.

राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया समोर

राजेंद्र जैन यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना उमेदवारीसाठी पक्षाचे आभार मानले. “छगन भुजबळ मला वडिलांसारखे आहेत. त्यांचे अनेकवेळा मला आशीवार्द लाभले आहेत. आमच्या पक्षात नाराजीचा प्रश्नच नाही. तसेच, पक्षात कोणताही सुप्त संघर्ष नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे पूर्व विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून ओखळले जातात. प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे त्यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या जैन यांनी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्या संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत आमदार म्हणून काम केले आहे.