Chhagan Bhujbal On Rohit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला होता.

खासदार डॉ.अमोल कोल्हे संयुक्तिक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते असं रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं. आता रोहित पवारांनी केलेल्या या दाव्याची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली आहे. ‘विलीनीकरण झालं नाही आणि कोण कोणत्या पदावर बसणार हे ठरवून टाकलं. मग उपमुख्यमंत्रीही ठरवला असेल, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षही ठरवला असेल’, असा खोचक टोला छगन भुजबळांनी रोहित पवार यांना लगावला आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“आता हे सगळे वेगवेगळे दावे करत आहेत, त्यांच्याबरोबर (शरद पवार गटातील नेते) अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं ठरवलं होतं असं ते म्हणतात. मात्र, अजित पवार यांनी आम्हाला काही सांगितलंच नाही. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं सुद्धा नाही, त्याआधीच कोण कुठल्या पदावर बसणार हे देखील ठरवून टाकलं होतं. मग त्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण असेल? हे देखील ठरलं असेल. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हे देखील ठरलं असेल. आता कोणी काहीही म्हणत असलं तरी आपण त्यावर काय बोलणार?”, असं म्हणत छगन भुजबळ यांनी रोहित पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

रोहित पवारांनी काय दावा केला?

“संयुक्तिक राष्ट्रवादीचे डॉ.अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. अशी दादांची इच्छा होती. त्यामुळे अमोल कोल्हे प्रामाणिकपणे पुढाकार घेत होते. याबाबत अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदेंनी सांगितलंय. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाकरता जयंत पाटलांच्या घरी १३ बैठका झाल्या आहेत. पाहिजेतर सीसीटीव्ही फुटेज तपासा. जयंत पाटलांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे”, असं रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

अमोल कोल्हेंनी काय म्हटलं होतं?

“जे काही ठरलं होतं ते पब्लिक डोमेनमध्ये बऱ्याचदा आलेलं आहे. दोन्ही पक्षाच्या एकत्रिकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. १६ मे रोजी मी अजित पवारांबरोबर प्रवास केला होता. बारामती ते पुणे असा हा प्रवास होता. तेव्हापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रचारसभा संपवून आम्ही हा प्रवास केला होता”, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. “तसेच दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाकरता १४ बैठका झाल्या होत्या, ११ वेळा जंयत पाटलांच्या घरी बैठका झाल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे”, असंही अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना म्हटलं.