तुमचा भुजबळ करू असं सांगतात; ‘ईडी’च्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्याचं खळबळजनक विधान

साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

chhagan-bhujbal
(File Phoro/chhagan bhujbal)

प्रताप सरनाईक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची राज्यात चर्चा सुरू आहे. यातच ईडीकडून साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपाकडून सातत्याने सरकार अस्थिर करण्यासाठी असे आरोप सत्ताधारी पक्षांतील नेत्यांकडून होत असतानाच ही कारवाई झाल्याने आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर राज्यात वेगवेगळ्या सुरू आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी हे विधान केलं आहे. “कुणावर तरी आरोप करायचे, कुणाला तरी नोटिसा द्या असं सुरु असतंय. त्यात ईडी म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं. पण, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल”, असं सांगत भुजबळ यांनी टीकास्त्र डागलं.

नाशिक शहराचा स्मार्ट सिटीमुळे बोजवारा उडाला असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले,” “त्या विषयात अजून लक्ष घातलेलं नाही. मात्र, एकदा पाहायला गेलो होतो. मात्र, स्मार्ट सिटी योजनेमध्ये नाशिकमध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तितकं काम झालेलं नाही. नाशिक शहरातील महापालिकेच्या स्मार्ट बससेवेला विरोध होता आणि आहे. जगातील कुठलीही बससेवा फायद्यात नाही. मुंबईची बेस्ट सेवा त्याला अपवाद आहे. कारण, बेस्टला वीज पुरवठ्यातून होणारा फायदा बससेवेत घातला जात होता. मात्र, इतर कुठेही बससेवा फायद्यात नाही. नाशिक महापालिकेला हा खर्च परवडणार आहे का हे पाहावं लागेल”, अशी भूमिका भुजबळ यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा- जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ईडी कारवाईवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल विरुद्ध लोक प्रतिनिधी आणि जनता असा संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं आहे,” असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chhagan bhujbal opposition leaders over ed action on ncp leaders bmh

ताज्या बातम्या