मुंबई : मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या महत्त्वाच्या सणासाठी गॅस उपलब्धतेसाठी अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिल्यावरून वाद निर्माण झाला असला तरी कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यानिमित्त गॅसची मागणी करणे अयोग्य नाही. अशा कार्यक्रमांसाठी गॅस उपलब्ध करून दिला जाईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवडा निर्माण झाला. याला पर्याय म्हणून ज्या ठिकाणी पाईप लाइन गॅस सेवा (पीएनजी) जोडणी उपलब्ध आहे, तिथे जोडणीसाठी पुढील तीन महिन्यांत अर्ज करावेत. अन्यथा त्यांचा एलपीजी सीलिंडर पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशरा अन्न व नागरीपुठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिला.
घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांनी पुढील तीन महिन्यात पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज करावेत. येत्या ३० जूनपर्यंत येणारे अर्ज तातडीने मंजूर करण्यात यावेत. गॅस कंपन्यांशी समन्वय वाढवून अर्ज निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
३० जूनपर्यंतची अट फक्त ज्या भागात पाईप गॅस सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांनाच लागू असणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाईप गॅसची सुविधा उपलब्ध नाही, अशा नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांचे एलपीजी सिलिंडर रद्द करण्यात येणार नाही. मात्र सुविधा असूनही ज्यांनी पीएनजी कनेक्शन घेतले नाही, त्यांनी तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन, भुजबळ यांनी केले.
मुंबई, पुणे शहरात नव्या बांधकामांना पाईप गॅस अनिवार्य
या संदर्भात केंद्र सरकारबरोबर चर्चा झाली असून त्यांनीही याला मान्यता दिली आहे. मुंबई, पुणे यासारख्या शहरातील सर्व नव्या बांधकामांमध्ये पाईप गॅस सुविधा अनिवार्य करण्याची मागणी केंद्र सरकारला केली असून ती मान्य झाली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे नवीन इमारतीना महापालिकांकडून ताबा प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी पाईप गॅसची जोडणी रहिवाशांना देणे आवश्यक असणार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राज्यात पुरेसा धान्यसाठा उपलब्ध असल्याने रेशनधारकांना आता तीन महिन्यांचा अन्नधान्य कोटा एकाच वेळी उचलण्याची परवानगी देण्यात आली असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.
