राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. ज्या सरकारमध्ये ते विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत होते, त्याच सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टींचा खुलासा केला. यावेळी नुकतेच मंत्रीपदाचे शपथ घेतलेले छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा >> अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली का? उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच ट्विटरच्या बायोमध्ये बदल "अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही सगळेच सहमत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. आम्ही पार्टी सोडलेली नाही", असं छगन भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं. "महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका करतो. पण ते अतिशय मजबुतीने देशाचं नेतृत्त्व करत असून त्यांच्या हातात देश सुखरूप आहे. महाराष्ट्र सरकार, भारत सरकार विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन जनतेच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत, भारत सरकारच्या सहकार्याशिवाय हे प्रश्न सोडवता येणार नाहीत", असंही छगन भुजबळ म्हणाले. हेही वाचा >> Ajit Pawar New Deputy CM : “मी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची…”, अजित पवारांनी घेतली शपथ "खरं सांगायचं तर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सांगितलं की २०२४ मध्ये पुन्हा मोदी साहेबच येणार आहेत. असं असताना सकारात्मक विचार केला पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. सरकारची मदत घेतली पाहिजे, सरकारला मदत केली पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे", असंही छगन भुजबळांनी पुढे स्पष्ट केलं.