“हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”, भुजबळांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

सोमय्या यांच्या या आरोपांवर आता भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “वारेमार आरोप करायचे हे तुमचं कामच.”

Chhagan Bhujbal Reaction Kirit Somaiya Serious Allegations
किरीट सोमय्यांच्या आरोपांना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर (Photo : File)

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. “मुंबईत सांताक्रुझ येथील ९ माजली इमारतीत भुजबळ यांचं अख्खं कुटुंब राहतं. या बिल्डिंगशी त्यांचा संबंध काय? तुम्ही तुमच्या या ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा आले कुठून?”, असे सवाल सोमय्या यांनी आज (१ सप्टेंबर) आपल्या नाशिकमधील पत्रकार पत्रकार परिषदेत उपस्थित केले. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या आरोपांवर आता भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आज फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न केला गेला आहे. या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

घराबाबत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले कि, “ते घर जुनं होतं. पुनर्बांधणीच्या स्किममधली ती इमारत आहे. ते पाडून त्यावर २.५ एफएसआय मिळतो. त्या इमारतीचे अर्ध माळे मूळ मालकाला आणि अर्धे आम्हाला राहणार आहेत.” पुढे भुजबळ म्हणाले कि, “खरंतर चार ते पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवलं. प्रॉपर्टीज अटॅच करायला लावल्या. आज दाखवलेली जमीन ही नाशिकपासून २० किमी लांब आणि १९८० मध्ये घेतलेली आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. म्हणूनच हा दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे का? पण, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. आम्ही लढत राहू.”

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी, किरीट सोमय्यांचं चॅलेंज

वारेमार आरोप करायचे हे तुमचं कामच!

भुजबळ किरीट सोमय्यांवर टीका करताना पुढे म्हणाले कि, “माझं वय ७५ आहे. त्यावेळी आम्ही १० हजार, १५ हजार रुपये एकराने घेतलेल्या जागा आहेत. त्या जागांचा भाव आता वाढला आणि ते आता तुम्ही सांगता. आम्ही ७५ वर्षे काय घरातच बसलो होतो का बोळ्यानं दूध पित? आम्ही पण काहीतरी काम धंदा केला आहे ना. अजूनही आमचे काही व्यवसाय सुरु आहेत. पण आम्ही तुमच्यासारखे खोटं बोलून, खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत आम्ही. वारेमार आरोप करायचे हे तुमचं कामच आहे. मी याविषयी जास्त बोलणार नाही. मी फक्त इतकंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र देखील तथ्य नाही. आज त्यांनी फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न केला.”

भुजबळांच्या राहत्या घरीही भेट देणार!

“मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती आहे”, असा आरोप करत किरीट सोमय्या यांनी आपण या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचंही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे, येत्या शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी देखील भेट देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhagan bhujbal reaction kirit somaiya serious allegations gst

ताज्या बातम्या