पुण्यातील ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, असं विधान भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गटाच्या) नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जातं आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष केली. यादरम्यान, त्यांना चंद्रकात पाटील यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक वक्तव्य; महायुतीलाही सुनावलं

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

“गुन्हेगारीबाबत प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. एखादी घटना उजेडात आली, की त्यावर तत्काळ कारवाई केली जाते. अनेकवेळा लोक घाबरून अशा घटना उजेडात येऊ देत नाहीत किंवा त्यावर बोलत नाहीत. याचा अर्थ अशा घटना अजिबात घडतच नाही, असा होत नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी बोलताना जरा सांभाळून बोललं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच “जर विरोधी पक्षातील नेत्यांनी अशाप्रकारे विधानं केली, तर आपण समजू शकतो. पण बरोबर असलेल्यांनी असं बोलणं योग्य नाही”, असेही ते म्हणाले.

अमोल मिटकरींचेही चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

तत्पूर्वी अजित पवार गटाचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनीही चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं होतं. “चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत”, असं अमोल मिटकरी म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

पुण्यातील घटनेबाबत बोलताना, “मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर “अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी १४ लाख होती. आता ७० लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण , रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे”, असं म्हणत त्यांनी सारवासारवदेखील केली होती.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरण काय?

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका पबमध्ये काही मुलं ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा – “अजित पवारांना महायुतीत एकटं पाडलं जातंय”, मिटकरींचा आरोप; विधानसभा निवडणुकीबाबत केलं मोठं वक्तव्य

पब मालकावर कारवाई

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पबमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यातदेखील घेण्यात आलं आहे. याशिवाय काही पोलीस अधिकाऱ्यांवरदेखील कारावाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.