२००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७१ तर काँग्रेसने ६९ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, तरीदेखील शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. याबाबत अजित पवार यांनी अलीकडच्या काही मुलाखती आणि भाषणांमधून नाराजी व्यक्त केली होती. यावर शरद पवार यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी आमच्याकडे ज्या नेत्यांचे पर्याय होते, त्यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री केलं असतं तर आमचा पक्ष फुटण्याची भीती होती.

शरद पवार म्हणाले, २००४ साली मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याचा निर्णय हा आम्ही फार विचार करून घेतला होता. अजित पवार हे तेव्हा नवखे असल्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्नच नव्हता. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी आमच्याकडे सक्षम नेता नव्हता. छगन भुजबळ आणि इतर काही नेत्यांचे पर्याय आमच्याकडे होते. मात्र त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर भविष्यात आमच्या पक्षात फूट पडली असती. लगेच नाही, मात्र भविष्यात तसं झालं असतं. त्याऐवजी आम्ही विचार केला की, मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देऊ आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून मंत्रिमंडळात काही अधिकची पदं घेऊ. जेणेकरून आमच्या पक्षातील नव्या नेत्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल.

शरद पवारांच्या या दाव्यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी काय दावा केला आहे ते मला माहिती नाही. मात्र मला एक सांगायचं आहे की १९९५ साली आमचं सरकार गेलं. त्यानंतर शरद पवारांनी मला विधान परिषदेवर पाठवलं. तसेच मला विरोधी पक्षनेता म्हणून नेमलं. त्या पाच वर्षांच्या काळात मी विरोधी पक्षनेता म्हणून खूप चांगलं काम केलं. शिवसेना आणि भाजपा सरकारच्या विरोधात मी उत्तम कामगिरी केली. त्याच काळात माझ्या घरावर हल्ला झाला, माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यात मी वाचलो. यासह तेव्हा अेक गोष्टी घडल्या, ज्या मी आता परत सांगत बसत नाही. त्यावेळी मी ‘वन मॅन आर्मी’ बनून सरकारविरोधात लढत होतो.

हे ही वाचा >> “२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

भुजबळ म्हणाले, सेना-भाजपा सरकारविरोधातील माझं काम पाहता त्यानंतर जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा मी मुख्यमंत्री झालो असतो. मात्र तत्पूर्वी आमचा पक्ष (काँग्रेस) फुटला. तेव्हा आम्ही सर्वच जण काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे की मीच मुख्यमंत्री झालो असतो. नंतरच्या काळात मी उपमुख्यमंत्री झालो. शरद पवार यांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं, तेव्हा पक्ष फुटला नाही, मात्र अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला.