मुंबई: “पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. पद हे अळवावरच्या पाण्यासारखे असते, ते कधी निसटून जाईल सांगता येत नाही. संघर्ष हाच आपला वारसा आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भूतकाळातील एका राजकीय प्रसंगाचा दाखला देत, “जर तेव्हा ६ महिने मिळाले असते, तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता,” असे विधान केले.

…म्हणून हुकले मुख्यमंत्रीपद! भुजबळांनी सांगितला ‘तो’ प्रसंग

आपल्या भाषणाची सुरुवात शेरोशायरीने करत छगन भुजबळ यांनी पक्षाच्या स्थापनेचा आणि संघर्षाचा काळ आठवला. ते म्हणाले, “गेल्या २७ वर्षांत अनेक कार्यकर्त्यांनी आणि भगिनींनी या पक्षाच्या उन्नतीसाठी रक्त-घाम गाळला आहे. काँग्रेस फुटल्यानंतरच्या काळात प्रमोद महाजन म्हणाले होते की आपण विधानसभा भंग करू आणि निवडणुका झाल्या. वास्तविक, ६ महिने आधीच विधानसभा स्थापन झाली होती. जर आपल्याला ते ६ महिने मिळाले असते, तर राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसला असता. अजितदादांनीही पूर्वी हेच बोलून दाखवले होते.”

ही विरासत सहजासहजी मिळालेली नाही!

आपल्या भाषणात पक्षाच्या २७ वर्षांच्या इतिहासाचा आणि संघर्षाचा पट मांडताना भुजबळ भावूक झाले होते. ते म्हणाले, “सफर मुश्किल था लेकिन साथ निभाया.. ये विरासत युं ही नहीं मिलती साथियों, कुछ लोगों ने अपना सब कुछ दांव पर लगाया है।” ज्यांना इतिहास माहिती असतो, तेच भविष्य घडवू शकतात, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघर्षाची आठवण करून दिली.

१९९९ मध्ये मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती!

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी मला काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीची ऑफर आली होती. तुम्ही काँग्रेसमध्ये या, आजच तुमचे नाव जाहीर करतो, असे सांगण्यात आले होते. मात्र, मी ती ऑफर नाकारली आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांसाठी शरद पवार साहेबांना साथ दिली,” असा मोठा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, “त्यावेळी काँग्रेसकडून मला थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती. अनेक फोन येत होते, पण मी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष झालो. जर १९९९ च्या निवडणुकीत प्रचाराला आणखी ६ महिने मिळाले असते, तर तेव्हाच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता.”

खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका!

पक्षांतर्गत नाराजी आणि अंतर्गत कुरबुरींवर बोट ठेवत भुजबळ यांनी कडक शब्दांत सुनावले. “पदं ही अळीवावरच्या पाण्यासारखी असतात, ती कधी निसटून जातील सांगता येत नाही. खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका! पक्ष म्हणजे कोणा एकाचा नाही, तर तो कार्यकर्त्यांचा समूह आहे. आपल्यात मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत,” असा सल्ला त्यांनी उपस्थित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला.

भुजबळ हे ‘चेकमेट’ करणारे खेळाडू: सुनील तटकरे

दरम्यान, समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मिश्कील टोला लगावला. तटकरे म्हणाले, “छगन भुजबळ हे कबड्डीचे खेळाडू आहेत, तसेच ते सिने कलाकार आणि निर्मातेही आहेत. त्यांनी शिवसेनेत असताना दोनवेळा महापौरपद मिळवले, तेव्हा त्यांनी कोणाला ‘चेकमेट’ केले होते? भुजबळांनी कबड्डीत एकाच वेळी सर्व खेळाडूंना बाद केले आहे. आपल्या पक्षात सर्व प्रकारचे खेळाडू असून हे सर्व अजितदादांनीच तयार केले आहेत.”