लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज असल्याचं सातत्याने समोर येत आहे. प्रचारसभांना दांडी मारणे इथपासून तर विरोधी पक्षातील नेत्यांची बाजू घेणे इथपर्यंतच्या काही घटनांमुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. मनुस्मृती जाळण्याच्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर चौफेर टीका झाली. भाजपा आणि त्यांच्या इतर मित्र पक्षांनी जितेंद्र आव्हाडांवर तोंडसुख घेतलं. परंतु, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र जितेंद्र आव्हाडांचं समर्थन केलं. यामुळे छगन भुजबळांना आता त्यांच्याच महायुतीतील नेत्यांकडून घरचा आहेर मिळतोय. या निमित्ताने छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीतील श्लोक घेणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यांच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे त्यांनी महाड येथील चवदार तळे येथे जात मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यावेळी त्यांच्या हातात असलेल्या पुस्तिकेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही छायाचित्र होते. त्यामुळे मनुस्मृतीची प्रत जाळताना त्यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाली. याबाबतचे वृत्त बाहेर येताच त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली. भाजपा, शिंदे गट, अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांविरोधात एल्गार पुकारला. त्यांच्याविरोधात निषेध मोर्चे काढण्यात आले. परंतु, याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली. त्यांच्याकडून नजरचुकीने बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना झाली असून याबाबत त्यांनी माफीही मागितली आहे. त्यामुळे यावरून मूळ मुद्द्याला दुर्लक्षित व्हायला नको. श्लोकच्या माध्यमातूनही मनुस्मृतीचा चंचूप्रवेशही नको, अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली.

हेही वाचा >> छगन भुजबळ महायुतीत नाराज? मनुस्मृतीचा उल्लेख करत म्हणाले…

गेल्यावर्षी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या मधून विस्तव जात नव्हता. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आगपाखड करत होते. मात्र, याप्रकरणात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतल्याने महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. यावरून अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळांवर टीका केली.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“तुम्हाला मनुस्मृती जाळायची होती तर ते पुस्तक जाळून खाक करा. तुम्ही जाळण्याचं ठरवलंत तर मग त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्याची गरज काय? आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं. या परिस्थितीत त्यांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांना अशा पद्धतीने केलं ते चुकीचं आहे, हे सांगण्याची आवश्यकता होती. भुजबळांनी जे केलं ते फार दुर्दैवी आहे”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.