बारामती या ठिकाणी २३ एप्रिलला पोटनिवडणूक पार पडणार आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. याबाबत आपण काँग्रेसशी चर्चा करु आणि त्यांची समजूत घालू, ही पोटनिवडणूक बिनविरोध कशी पार पडेल याकडे लक्ष देऊ असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे ही बारामतीला पोटनिवडणूक होणार आहे. सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळेच प्रयत्न करत आहोत असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
काँग्रेसचे उमेदवार बारामतीत उभे राहिल्याचं मला कळलं आहे. यातून मार्ग काढला जाईल, आम्ही काँग्रेसशी चर्चा करु. कारण एका वेगळ्या परिस्थितीतून, कठीण परिस्थितीतून ही सगळी निवडणूक आपल्याला लढवावी लागते आहे, नाहीतर काहीच कारण नव्हतं. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला, त्यामुळे ही पोटनिवडणूक होते आहे. अनेकांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आम्ही चर्चा होईल, आम्ही त्यांना विनंती करु. काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे. अनेकांनी स्वतःहून जाहीर केलं की बारामतीत उमेदवार देणार नाही. आता काँग्रेसने विचार करावा अशी आमची इच्छा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीमधले कलह हा आमचा अंतर्गत प्रश्न, चर्चेने गोष्टी सोडवू-भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही कलह आहेत का? असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले की काही गोष्टी आहेत, त्याबाबत आम्ही मीडियावर भाष्य करणार नाही. हा काही मीडियाच्या चर्चेचा विषय नाही. आम्ही आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात काम करत आहोत. पक्ष आपल्याला मजबुतीने पुढे न्यायचा आहे, आम्ही आमच्यात ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही चर्चेने मिटवू. तसंच कार्यकर्त्यांनीही याच्या चर्चा करु नयेत अशी आमची इच्छा आहे. जे काही प्रयत्न वगैरे चालले आहेत त्याची चर्चा काही आम्ही करणार नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसंच रोहित पवार यांनी जे आवाहन केलं आहे ती चांगली गोष्ट आहे. त्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच ते आवाहन केलं आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
नाशिकचं नाव खराब करण्याचं काम अशोक खरातने केलं, तो कसला कॅप्टन?-भुजबळ
नाशिकचं नाव खराब करायचं काम अशोक खरातने केलं आहे. हा कसला कॅप्टन? या प्रकरणात कुणालाही क्षमा करणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कुंभमेळाही येतो आहे, अशात नाशिकची बदनामी झाली आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी गेल्या होत्या. अशोक खरात कसला कॅप्टन वगैरे? कुठेतरी खलाशी वगैरे असेल तो. नाशिकचं नाव खराब करायचं काम या सगळ्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की कुणालाही माफ करणार नाही. त्याप्रमाणे कारवाई होईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
