कराड : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीतर्फे येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या दरवाजा क्रमांक एक समोरील शंभूतीर्थवर या नियोजित जागेवर बसवण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल २५ फुटी भव्य पुतळा आणण्यात आला आहे. छत्रपती शंभूराजेंचा हा पुतळा पाहण्यासाठी शिवशंभूप्रेमी व नागरिकांनी गर्दी केली आहे.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजित पाटील व समिती सदस्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून, शंभूतीर्थवर संभाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारण्यासाठी जवळपास १२ कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. या निधीतून स्मारकाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.
स्मारकात बसवण्यात येणारा पुतळा हा २५ फुटी असून, समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा बनवण्याचे काम कोल्हापूरच्या आर्ट अफेनिटी स्टुडिओचे संजीव संकपाळ व अतुल डाके यांना दिले होते. त्यांनी दोन वर्षे परिश्रम घेऊन अभ्यासपूर्वक हा पुतळा साकारला आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा स्मारकातील उंच चबुतऱ्यावर बसवण्यात येणार आहे.
तेथील किरकोळ कामे पूर्ण करून पुतळा लवकरच बसवण्यात येणार आहे. स्मारकात वस्तुसंग्रहालय, छ. संभाजी महाराजांची म्युरल्स, अम्पि थिएटर, अभ्यासिका असेल. पुतळ्यासमोर पाण्याचे कुंड आणि पायऱ्या असतील. पाण्यात पुतळ्याची प्रतिमा दिसणार आहे.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सचिव रणजीत पाटील म्हणाले, कराडमध्ये महाराजांचे स्मारक व्हावे, हे कराडकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. किरकोळ कामे केल्यानंतर चबुतऱ्यावर पुतळा बसविण्यात येणार आहे.
शिल्पकार संजीव संकपाळ व अतुल डाके म्हणाले, सुमारे पाच हजार किलो वजनाचा हा पुतळा बनवण्यासाठी दोन वर्षे लागली. पुतळा बनवताना छत्रपती संभाजी महाराजांचे वय आणि शौर्य त्यातून दिसावे, यासाठी शंभू प्रतिमांचा अभ्यास केला आहे. १५ जणांच्या चमूने यासाठी परिश्रम घेतले आहेत.
प्रथम मातीचा पुतळा बनवून, त्यास शासनाची परवानगी घेतली. आणि त्यानंतर साचा बनवून (डाय टाकून) ब्राँझचा पुतळा बनवण्यात आला आहे. हे स्मारक व परिसर भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार आहे. महाराष्ट्रात असे सुरेख स्मारक अन्यत्र नसेल. हे शिल्प बनवण्याचे भाग्य लाभले असे समाधान शिल्पकारांनी व्यक्त केले.
