Abhijeet Dipke Education Journey highlights : सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर देशात कॉक्रोच जनता पार्टीचं वादळ निर्माण झालं. या पार्टीने नीट पेपरफुटीविरोधात आवाज उचलून जंतर-मंतर येथे मोठं आंदोलन उभं केलं. संसदेत मोर्चा नेला. आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांचा लाठीमार सहन केला. या संपूर्ण आंदोलनाच्या मध्यभागी होते ते कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके. मुळचे महाराष्ट्राचे असलेले अभिजीत दिपके हे अमेरिकेत शिकत होते. पण या आंदोलनासाठी भारतात परतले. त्यामुळे संभाजी नगर येथे बालपण गेलेल्या अभिजीत दिपकेंची झेप अमेरिकेपर्यंत कशी गेली, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. या प्रश्नाचं उत्तर खुद्द अभिजीत दिपकेंनीच दिलंय. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
“माझा जन्म छत्रपती संभाजीनगरमध्ये झालाय. तिथेच माझं शालेय शिक्षण झालं. शाळेत असताना मी क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो. मला क्रिकेट खूप आवडायचं. मी डिव्हिजनल, जिल्हास्तरीय खेळलो आहे. पण प्रत्येक घरातल्यांना वाटतं की प्रत्येक मुलगा तेंडुलकर नसतो. त्यामुळे माझ्याही पालकांनी मला शिक्षणाकडे लक्ष द्यायला सांगितलं”, असं अभिजीत दिपकेंनी सांगितलं.
पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. याबाबत अभिजीत दिपके म्हणाले, “मग शिक्षणासाठी पुण्यात गेलो. तिथे पदवीचं शिक्षण घेतलं. तेव्हाच मला आम आदमीकडून इंटर्नशीपची ऑफर आली. ती मी स्वीकारली आणि दिल्लीत गेलो.”
आम आदमी पार्टीची ऑफर का आवडली?
“आम आदमी पक्षाचं शिक्षण आणि आरोग्याबाबत जे मॉडेल होतं, ते मला आवडलं होतं. जातीधर्माचं राजकारण न करता शिक्षण आणि आरोग्यावर त्यांनी भर दिला होता. त्यामुळे मी दिल्लीत २ ते ३ वर्षे काम केलं. पण तेव्हा जाणवलं की या पैशांत माझं घर चालणार नाही. त्याकरता मला काहीतरी करावं लागणार आहे”, असं अभिजीत दिपकेंनी सांगितलं.
पुण्यात एक्स्पोजर मिळालं
“मी संभाजीनगरमध्ये वाढलो. मला वाटलं होतं की मी फार फार तर कोणत्या तरी कंपनीत काम करेन. संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलांची स्वप्न फार लहान असतात. दिल्ली किंवा मुंबई-पुण्यात राहणाऱ्यांची स्वप्न मोठी असतात. १० वर्षांपूर्वी संभाजीनगरमध्ये विद्यार्थी फार फार तर डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग करत होते. माझीही स्वप्न मोठी नव्हती. पण पुण्यात गेल्यानंतर मला एक्स्पोजर मिळालं. तिथून मी आम आदमीच्या इंटर्नशीपसाठी अप्लाय केलं”, असंही त्यांनी सांगितलं.
विदेशातून शिकून आलेले मित्र दिल्लीत भेटला
ते पुढे म्हणाले, “संभाजी नगरमध्ये असताना मला कधी वाटलं नव्हतं की आपण दिल्लीला जाऊ. पण पुण्यात गेल्यानंतर मला वाटलं की आपण दिल्लीलाही जाऊ शकतो. दिल्लीत गेल्यानंतर माझे मित्र असे बनले की जे बाहेरून शिकून आले होते किंवा विदेशात शिकायला जाणार होते. त्यामुळे मला तिथे एक्स्पोजर मिळालं. दिल्लीला गेल्यानंतर मला वाटलं की हे लोक जाऊ शकतात तर मी का जाऊ शकत नाही. “
अमेरिकेत जाण्याबाबत ते म्हणाले, “बोस्टर्न युनिर्व्हसिटीकडून मला स्कॉलरशीप मिळाली. मग मला कर्जही काढावं लागलं. त्यावर मी तिथे शिकायला गेलो. दोन वर्ष मी तिथेच शिकायला होतो. आता कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी भारतात परतलो.”
दरम्यान, त्यांचा आता आम आदमी पार्टीशी काही संबंध नाही. तिथे बरेच मित्र आहेत. ते अजूनही संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
