Shivaji Maharaj Bharat Gaurav Tourism Train Details: राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’ला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला आज ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’ सुरू करण्यात आलेली आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक स्थळांना भेट देणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास जागृत करण्याचे काम करणार आहे.”

८० टक्के प्रवासी ४० वर्षांखालील

दरम्यान, आज सुरू झालेल्या पहिल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’मधून ७०० हून अधिक पर्यटक प्रवास करणार आहेत. यामध्ये राज्यातील गडचिरोली ते गडहिंग्लजपर्यंतच्या विविध भागांतील लोकांचा समावेश आहे. याचबरोबर या विशेष रेल्वेच्या पहिल्या फेरीत १५० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तसेच, एकूण प्रवाशांपैकी ८० टक्के प्रवासी ४० वर्षांखालील आहेत. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) माहिती दिली आहे.

‘शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे तिकीट दर

‘शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे इकॉनॉमी (स्लीपर क्लास) तिकीट प्रति व्यक्ती १३,१५५ रुपये, कम्फर्ट (३-एसी) १९,८४० रुपये आणि सुपीरियर (२-एसी) तिकीट प्रति व्यक्ती २७,३६५ इतके असणार आहे. या तिकिटामध्येच सर्व प्रवाशांचा रेल्वे प्रवास, हॉटेलमधील रात्रीचा मुक्काम, सर्व जेवण (फक्त शाकाहारी), बस प्रवास, प्रवास विमा, आणि टूर एस्कॉर्ट सेवा यांचा समावेश असेल.

कसा असणार सहा दिवसांचा मार्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेन महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देईल, ज्यामध्ये किल्ले, मंदिरे आणि संग्रहालये यांचा समावेश आहे. सहा दिवसांच्या या प्रवासात पर्यटकांना रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड, पन्हाळा आणि पुण्यातील लाल महाल, कसबा गणपती मंदिर व शिवसृष्टी थीम पार्क पाहता येणार आहे. याचबरोबर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर यासारखी धार्मिक स्थळे देखील या दौऱ्याचा भाग आहेत.