मुंबई : महाराष्ट्र तसेच देशभरात मोडी लिपीतील ८० कोटींहून अधिक कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवेकालीन तसेच यादव कालीन इतिहास दडलेला आहे. मात्र पुरेसे मोडी लिपी तज्ज्ञ नसल्याने हा इतिहास या कागदपत्रांतच बंदिस्त आहे. हा इतिहास उलगडण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ३० मोडी लिपी अभ्यासकांची नियुक्ती करण्यात आली असून ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रांचे अचूक मराठी लिप्यंतर तसेच इंग्रजी भाषांतर करणार असून या मोडी अभ्यासकांची यादीच सरकारने जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात पुण्यासह जिथे जिथे संस्थाने होती तेथे पेशवेकालीन, शिवकालीन, आंग्लकालीन आणि बहामनीकालीन अशा चार प्रकारांत मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत. या मोडी लिपीतील प्रशासकीय, महसूल, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी तसेच ऐतिहासिक अभिलेखांचे जतन व अभ्यास सुलभ करण्याच्या उद्देशाने मोडी लिपी अभ्यासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील ३० तज्ज्ञ मोडी लिपीतील अभ्यासकांची निवड करण्यात आली आहे.
या मोडी लिपी अभ्यासकांना मराठीत भाषांतरासाठी प्रति शब्द २.५० रुपये तर इंग्रजी भाषांतरासाठी प्रति शब्द ३.०० रुपये दिले जाणार अहेत. या अभ्यासकांककडे संगणक व इंटनेट सुविधा असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कामातील अचूकता, कार्यक्षमता आणि तत्परता लक्षात घेऊन नामिकेतून नाव वगळण्याचा किंवा नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचा अधिकार शासनाकडे राहणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठी भाषा विभागाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक मोडी दस्तऐवजांचे संवर्धन, संशोधन आणि डिजिटल जतनाला मोठी चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया इतिहास अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
