सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या भूमिकेत आता बदल झाल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे सूत्रधार असलेल्या नगरपालिकेच्या सभेत शनिवारी छत्रपती शिवाजीमहाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिवाजी चौकात बसवण्याचा ठराव मंजूर झाला. आता राज्य सरकारकडून परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेण्याचे ठरले.
गेल्या १५ वर्षांपासून शिवाजी चौकात शिवाजीमहाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी हिदुत्ववादी संघटना करीत आहेत. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. काँग्रेसचा त्याला विरोध होता. माजी आमदार ससाणे यांनी आंदोलनाची दखल न घेता विरोध कायम ठेवला होता. पण त्यांच्या भूमिकेत अचानक बदल झाला. त्यामुळे आज सभेत ठराव मंजूर झाला.
नगराध्यक्ष राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याच्या विषयावर चर्चा करताना भाजपच्या नगरसेविका भारती कांबळे यांनी पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची मागणी केली. यावर सत्ताधारी नगरसेविकांनी उलटा पवित्रा घेत आमचीही तीच मागणी आहे. मात्र त्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. आपण भाजपच्या आहात, केंद्रात व राज्यात आपलेच सरकार आहे. त्यामुळे आपण पुढाकार घ्यावा. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्यास आम्ही सर्व नगरसेवक परवानगीसाठी त्या सांगतील तेथे जाण्यास तयार आहोत, असे आवाहन छल्लारे यांनी केले. शामलिंग शिंदे म्हणाले, माझे कार्यालय शिवाजी चौकातच आहे. पुतळा तेथे बसविल्यास मला दररोज महाराजांचे दर्शन होईल. त्यानंतर चर्चा होऊन ठराव मंजूर झाला.
शहरात चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन सत्ताधा-यांनी चार वर्षांपूर्वी जनतेला दिले. साठवण तलाव योजना पूर्ण होऊनही अद्याप शब्द पाळला नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंजुश्री मुरकुटे यांनी केला. यावर मुख्याधिकारी मोरे यांनी चोवीस तास पाणी योजनेसाठी मीटर खरेदीचे टेंडर काढल्याबाबत माहिती दिली. येत्या महिनाभरात संजयनगर भागात ९७२ कुटुंबांना प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात येईल. ६ महिने अभ्यास केल्यानंतर पूर्ण शहरासाठी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या भुयारी गटार, रस्ते, गटारी यांचा विषय विरोधकांनी उचलून धरला.