छत्तीसगढमधील बस्तर येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सायंकाळी केलेल्या हल्ल्यानंतर अपहरण करण्यात आलेल्या छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचा मुलगा दिनेश आणि आठ सुरक्षा जवानांचे मृतदेह रविवारी बस्तर भागात आढळून आले. नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, आदिवासी नेते महेंद्र कर्मा यांच्यासह तब्बल २९ जणांना ठार करणाऱ्या नक्षलवाद्यांनी ऐन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे राज्यातील नेतृत्वच संपवून टाकण्याचा डाव साधल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामुळे राज्य पोलीस व केंद्रीय सुरक्षा दलाच्या कामगिरीवरसुद्धा प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून, सुरक्षेसंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन न केल्यामुळेच हा प्रकार घडल्याची माहिती आता समोर आली आहे.
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून यात्रा काढल्या जात आहेत. मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या ‘विकास यात्रे’ला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने ‘परिवर्तन यात्रा’ जाहीर केली. या यात्रेच्या निमित्ताने शनिवारी सुकमा गावात आयोजित जाहीर सभा आटोपून काँग्रेसचे नेते जगदलपूरला परत जात असताना दरभा पहाडीत नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. यात महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल, राजनांदगावचे माजी आमदार उदय मुदलीयार, काँग्रेसचे नेते राजेश चंद्राकर, चंद्रहास ध्रुव, योगेंद्र शर्मा यांच्यासह एकूण २७ जणांना या हल्ल्यात मरण आले. या हल्ल्यात जखमी झालेले माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला यांना गुरगाव येथील मेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आदींनी रविवारी सकाळी रायपूर येथे रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. तर या हल्ल्यात ठार झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा युवा नेते राहुल गांधी शनिवारी रात्रीपासूनच रायपूर येथे मुक्काम ठोकून आहेत. त्यांनीही जखमींसोबतच या हल्ल्यात ठार झालेल्या नेत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही दिली. पंतप्रधानांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवरील नक्षली हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत मुख्यमंत्री रमण सिंग यांनी तीन दिवसांचा शोक जाहीर केला.

देश नक्षलवादापुढे झुकणार नाही व हल्ले करणाऱ्यांना शिक्षा घडवल्याशिवाय राहणार नाही. हल्लेखोरांचा माग काढला जाईल व त्यांना न्यायासनासमोर उभे करून शिक्षा घडवली जाईल. आम्ही अनेक आव्हाने झेलली आहेत व हा हल्ला म्हणजे आम्हाला आव्हान आहे. असे असले तरी आम्ही पुढे जातच राहू.     – पंतप्रधान मनमोहन सिंग</strong>