अहिल्यानगरः सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई हे नेवासा तालुक्यातील देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाशी घनिष्ठ श्रद्धा आणि नातं जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी पार पाडत असताना ते वेळ काढून देवगड येथे दर्शनासाठी आवर्जून येत असत, या आठवणींना भाविकांनी, गवई यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर उजाळा दिला.
न्यायमूर्ती भूषण गवई अनेकदा आपल्या कुटुंबीयांसमवेत भगवान श्री दत्तात्रय दर्शनासाठी देवगडला आले आहेत. तसेच सद्गुरू किसनगिरीबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यातही सहभागी होत त्यांनी अजान वृक्षाखाली बसून ‘किसनगिरी विजय ग्रंथा’चे पारायण केल्याचे भाविकांनी पाहिले आहे.
सरन्यायाधीश गवई यांनी देवगडच्या आध्यात्मिक व निसर्गसंपन्न परिसराचे नेहमीच कौतुक केले आहे. भूलोकीचा स्वर्ग अशी उपमा त्यांनी या तीर्थक्षेत्राला दिली होती. पीठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज आणि उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्याशी वेळोवेळी सुसंवाद साधला.
सरन्यायाधीशपदी निवड झाल्याने गुरुदेव दत्तपीठाच्या वतीने भास्करगिरी महाराज व प्रकाशानंदगिरी महाराज यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. देवगड भक्तपरिवाराने त्यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले.