मुंबई : वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांच्या आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईमध्ये आरोग्याचा जागर केला जाणार आहे. तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि वैद्यकीय तज्ञ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. वैद्यकीय उपचारांपेक्षा आजार टाळण्याच्या दृष्टिकोनातून तरुणाईमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यावर या उपक्रमाचा भर राहणार आहे.

वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला तसेच अन्य विद्याशाखांतील विद्यार्थी या संवादात सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ञ विद्यार्थ्यांना बदलती जीवनशैली आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन करतील. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले जाणार आहे.

मोबाईल आणि समाजमाध्यमामुळे वाढलेला स्क्रीन टाइम, बदललेल्या आहाराच्या सवयी, शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव आणि मानसिक ताण हे संवादातील प्रमुख विषय असतील. तरुणांमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना तज्ञांशी थेट संवाद साधता येणार आहे.

आरोग्याशी संबंधित प्रश्नही मोकळेपणाने मांडता येतील. या संवादातून मिळालेली माहिती विद्यार्थ्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता कुटुंब, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आरोग्यदूताची भूमिका बजावण्याची संधीही मिळणार आहे.