मुंबई: ‘महाराष्ट्र विश्वासार्ह राज्य असून आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. त्यामुळे यंदाही राज्यात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह प्रतिनिधी मंडळासमवेत दावोसला गेले आहेत. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पॅव्हेलीयन मध्ये माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र हे देशात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यामुळे भारतातील अन्य राज्यांशी आमची चांगल्या अर्थाने स्पर्धा आहे. सरतेशेवटी देशासाठी ही बाब चांगलीच ठरते. पण यातही महाराष्ट्र पुढे आहे याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी गुंतवणूक मिळवणार असून, त्यासाठी वैविध्यपूर्ण अशा दहा ते बारा क्षेत्रातील उद्योगांशी समन्वय साधला जात आहे. आता तिसरी मुंबई उभी राहते आहे. तिच्यासाठी मोठी गुंतवणूक मिळण्याचे संकेत आहेत. आमच्याकडे उद्योजकांसाठी सोयी सवलतींचे उत्तम ‘मेन्यू कार्ड’ आहे . त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही उद्योग, गुंतवणूकदारासाठी एक प्रकारे चावडी आहे. याठिकाणी दरवर्षी आम्ही महाराष्ट्राकडे काय आहे, कोणती क्षमता आहे, हे मांडत असतो. यंदाही गतवर्षीच्या तुलनेत आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास आहे. कारण देशात अशा प्रकारे येणारी गुंतवणूक व त्याबाबतचे करार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अशाप्रकारे सुमारे ६० ते ६५ करार प्रत्यक्षात आणण्यात राज्य सरकारला यश मिळाले आहे. महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांनी या मंचाचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
या दशकात महाराष्ट्राने सरासरी १० टक्क्यांहून अधिक विकासदर कायम राखला असून, राज्य २०३२ पर्यंत एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिले राज्य बनू शकते. मात्र, हा टप्पा आणखी वेगाने २०३० पर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असली, जगभरातील विकासदर मंदावले असताना, महाराष्ट्र मात्र आपला विकासदर टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत-असल्याचा दावाही त्यांनी केला.
वाढवण बंदराचा पहिला टप्पा तीन वर्षात
वाढवण हे जगातील सर्वोत्तम १० बंदरांपैकी एक असून जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे असलेले हे बंदर जगातील सर्वात मोठ्या जहाजांना सामावून घेण्यास सक्षम असेल. पुढील तीन वर्षांत पहिला टप्पा कार्यान्वित होईल, आणि पुढील १०० वर्षांसाठी भारताच्या सागरी व पुरवठा साखळीला बळ देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
